सत्तारूढ गटाचे नेते माझ्या घरी का आले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:38+5:302021-05-01T04:23:38+5:30

(विश्वास पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुंबईतील गोकुळची जागा विक्री करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचा ...

Why did the leaders of the ruling group come to my house? | सत्तारूढ गटाचे नेते माझ्या घरी का आले होते

सत्तारूढ गटाचे नेते माझ्या घरी का आले होते

(विश्वास पाटील यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुंबईतील गोकुळची जागा विक्री करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचा आरोप सभासदांना निनावी पत्रे पाठवून काही मंडळी करत आहेत, गोकुळची जागाच मुंबईत नाही, मग विक्री करायचा प्रश्न येतोच कोठे? अध्यक्ष म्हणून जरी मी सभेत मल्टिस्टेटचा ठराव मांडला असला तरी गोकुळच्या सत्तारूढ गटाच्या नेत्यांचा यासाठी प्रचंड आग्रह होता. मल्टिस्टेटचा विषय बाळासाहेब खाडे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला, त्याला संचालकांनी नाइलाजास्तव मंजुरी दिल्याचा पलटवार ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केला.

वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी खाली बसलेले नेते ‘विरोधक आलेत, लवकर ठराव मांडा,’ असे मला ओरडून का सांगत होते? मी भ्रष्टाचारी होतो, तर मग आपल्या पॅनलमध्ये येण्यासाठी नेते माझ्या घरी का आले होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुंबईमध्ये गोकुळच्या मालकीची जागा नाही, मग त्याची विक्री करण्याचा प्रश्न येतोच कोठे? माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे निवडणुकीच्या अगोदर पॅनलमध्ये या म्हणून माझ्या घरी का आले होते? सत्ताधारी मंडळींना पराभव जवळ दिसू लागल्याने चुकीची पत्रे पाठवून सभासदांची दिशाभूल करत आहेत. त्यांची सहानुभूती मिळवण्याची धडपड सुरू आहे. दुर्दैवाने ज्यांचा व्यवसाय जागा खरेदी- विक्री आहे, त्यांनीच आरोप करणे हास्यास्पद असल्याचे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.

मल्टिस्टेटचा मुद्दा आला त्यावेळी आपण अध्यक्ष होतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जे माझ्यावर आरोप करत आहेत, ते बाळासाहेब खाडेच मल्टिस्टेटचे सूचक होते, त्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. खाडे यांनी मल्टिस्टेटचा हा विषय मांडावा, अशा सत्तारूढच्या नेत्यांनीच त्यांना सूचना दिल्या होत्या. नेत्यांचा जास्त आग्रह असल्यानेच त्यास संचालकांनी मंजुरी दिली. मल्टिस्टेटसाठी कोणाचा आग्रह होता, कोणाचा काय स्वार्थ दडला होता, हे दूध उत्पादकांना माहिती आहे. त्यामुळे सत्ताधारी मंडळीच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच बेताल आरोप करत सुटल्याचे विश्वास पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Why did the leaders of the ruling group come to my house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.