इतकी कामे करूनही का पडलो...?

By Admin | Updated: October 21, 2014 00:39 IST2014-10-21T00:36:55+5:302014-10-21T00:39:26+5:30

सतेज पाटील यांना प्रश्न : प्रश्नातच दडलंय उत्तर

Why did I do so many works? | इतकी कामे करूनही का पडलो...?

इतकी कामे करूनही का पडलो...?

विश्वास पाटील - कोल्हापूर  दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करूनही विधानसभा निवडणुकीत आपण का पराभूत झालो, असा प्रश्न पडला आहे. मोदी लाट होती हे मान्यच परंतु तरीही ती थोपवून विजयी होण्याइतके नक्कीच काम असताना त्यांचा पराभव त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्याही जिव्हारी लागला आहे. आज दिवसभर त्यांच्या निवासस्थानी लागलेली रिघ हाच प्रश्न घेऊन त्यांना भेटत होती.
निवडणुकीच्या आदल्या आठवड्यापर्यंत या मतदारसंघात सतेज पाटील यांच्याविरोधात कोण उमेदवार रिंगणात असणार हे नक्की नव्हते. लोकसभेला धनंजय महाडिक यांच्याशी तडजोड झाल्याने फारसा तगडा उमेदवार रिंगणात असणार नाही, असे चित्र होते. उमेदवार म्हणूनही अमल यांचा विचार केल्यास ते तगडे नव्हतेच परंतु तरीही लोकांना त्यांनी निवडून दिले, याचा अर्थ सतेज पाटील यांच्याबद्दलची व काँग्रेसबद्दलची नाराजी मतदारांत जास्त होती, असेच म्हणावे लागेल.
गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील यांनी मतदारसंघांत अनेक कामे केली. त्याशिवाय एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून जे करायला हवे त्यातील एकही गोष्ट त्यांनी सोडली नाही. ‘गृहिणी महोत्सव’, ‘कला महोत्सव’, ‘धार्मिक प्रवचन’, रोजगार मेळाव्यापासून ते दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देण्यापर्यंत कुठेच मागे नव्हते. त्यामुळेच या निवडणुकीत ते विजयी होतील, असे सर्वसाधारण जनमत होते. परंतु मतदारसंघातील जनतेने मात्र ते खोटे ठरविले.
तशी काँग्रेस इतकीच किंबहुना काँग्रेसपेक्षा जास्त नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होती परंतु तरीही हसन मुश्रीफ यांनी आपला गड राखला. ते सतेज पाटील यांना जमले नाही, कारण त्यांच्या गेल्या तीन वर्षांतील राजकारणात बेरजेपेक्षा वजाबाक्याच जास्त झाल्या. अनेक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांशी त्यांनी वैरत्व निर्माण केले. जो आपल्या विरोधात आहे, तो कायमचाच शत्रू असल्यासारखा त्यांचा व्यवहार राहिला. ‘तो गेला...हा गेला तर जावू दे, मला त्याचा काही फरक पडत नाही’ असे ते समजत राहिले.
प्रा. जयंत पाटील यांच्यासारख्या उपद्रवमूल्य असलेल्या लोकांना मित्र करता आले नाही तरी चालेल परंतु ते शत्रू होणार नाहीत याची दक्षता त्यांना घेता आली नाही. मंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांशीही त्यांचा दुरावा निर्माण झाला. साहेब, आपल्याला पूर्वीसारखे भेटत नाहीत, अशी नाराजी व्यक्त झाली. त्याची वेळीच दखल घेतली न गेल्याने हे सगळे साचून मतपेटीत व्यक्त झाले. साधे एक उदाहरण द्यायचे झाल्यास त्यांच्या या निवडणुकीत प्रचारासाठी विक्रमसिंह घाटगे हे मान्यवर नेते वगळता एकही दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता त्यांच्याकडे नव्हता. होते सगळे पाचव्या फळीतील लोक. म्हणजे सतेज पाटील यांचे काम किती चांगले आहे, हे दुर्वास कदम सांगत होते.
त्याच्या वृत्तपत्रांत बातम्या आल्या परंतु लोकांवर प्रभाव पाडू शकेल, अशी प्रचारयंत्रणा राबली नाही. गेल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्यासारखा तगडा प्रतिस्पर्धी असतानाही लोकांनी निव्वळ तुमचा कामाचा माणूस व कार्यकर्त्यांना जपणारा नेता, या प्रतिमेवर तुम्हाला विजयी केले, परंतु ते या वेळेला झाले नाही. राजकारणात ज्यांना मोठे व्हायचे असते त्यांना अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो. छोट्या-छोट्या गोष्टी पोटात घालून पुढे जावे लागते. सगळ््यांचाच हिशेब आपण देत बसलो की लोक कधीतरी आपलाच हिशेब करतात. सतेज पाटील यांच्याबाबतीत नेमके हेच घडले म्हणून त्यांचा पराभव झाला.

या बाबी ठरल्या अडचणीच्या...
काँग्रेसमध्ये आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी शत्रुत्व. त्याचवेळेला जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशीही चांगले संबंध ठेवण्यात अपयश.
तिकडे ‘मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस’ व साताऱ्याचे संपर्कमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्याही ‘हिटलिस्ट’वर.
गुटखा बंदी केली म्हणून गुटखा उत्पादक हिशेब करायला टपून बसलेले. या लोकांनी किती कोटी खर्च केले, याचे आकडे आता बाहेर पडू लागले आहेत.

Web Title: Why did I do so many works?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.