आम्हाला कशाला अडचणीत आणता?
By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T00:29:44+5:302014-11-30T01:00:48+5:30
महाडिक यांचा सवाल : अपात्र लाभार्थी शोधमोहिमेवर उपरोधात्मक टिप्पणी

आम्हाला कशाला अडचणीत आणता?
कोल्हापूर : राष्ट्रीय सहायता कार्यक्रमांतर्गत विविध योजनांमध्ये अपात्र लाभार्थी शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. अपात्र असलेल्यांवर गुन्हे दाखल करून पात्र असणाऱ्यांना लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी यांनी दिली. यावर खासदार धनंजय महाडिक यांनी निवडतानाच पात्र आहेत की नाहीत, हे का पाहिले नाही? आता अपात्र लाभार्थी शोधमोहीम राबवून आम्हाला कशाला अडचणीत आणता? अशी उपरोधिक टिपणी केली.
श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना, विधवा वेतन योजना, आदी योजनांमध्ये सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्याचे असल्याचे शासकीय विश्रामगृहात झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत निदर्शनास आले. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी कमी लाभार्थी असलेल्या तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे का, असा सवाल केला. ते म्हणाले, लाभार्थी कमी असलेल्या गावांतील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार काम करीत नाहीत, असे स्पष्ट होते. अधिक लाभार्थी असलेल्या तालुक्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र, लाभार्थी कमी असलेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्व तलाठ्यांना सूचना देऊन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सांगावे.
यावर उत्तर देताना सौ. कुलकर्णी म्हणाल्या, अपात्र लाभार्थी शोधून कारवाई करण्याच्या सूचना शासनाकडून आल्या आहेत. त्यानुसार अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.