कोथळीमध्ये कोण मारणार मैदान ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:15+5:302021-01-08T05:23:15+5:30
शुभम गायकवाड : उदगाव - शिरोळ तालुक्यातील लक्षवेधी असलेली कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी होत आहे. स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेनेविरुद्ध ...

कोथळीमध्ये कोण मारणार मैदान ?
शुभम गायकवाड : उदगाव
- शिरोळ तालुक्यातील लक्षवेधी असलेली कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी होत आहे. स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेनेविरुद्ध आवाडे व यड्रावकर गट आमने-सामने आला आहे. सतरा जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सात अपक्षांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे याचा कोणाला फटका बसेल हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच कोथळीत यंदा कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. कोथळी ग्रामपंचायतीसाठी प्रचारयंत्रणा गतिमान झाली आहे. गतवेळी एकूण सतरा जागांपैकी अकरा जागा बिनविरोध, तर सहा जागांसाठी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. सामंजस्याने पार पडलेली निवडणूक नंतरच्या कालावधीत नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजली होती. सरपंच, उपसरपंच पदाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे नाराजीही दिसून आली होती.
गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाले. राजकीय ईर्ष्येमुळे यंदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे दुरंगी लढत स्पष्ट झाली आहे. कोथळी विकास आघाडीकडून दिलीप मगदूम, संजय नांदणे, देवगोंडा पाटील, गौतम इंगळे हे नेतृत्व करीत आहेत, तर बहुजन विकास आघाडीकडून दिलीप पाटील, भीमगोंडा बोरगावे, राजू पाटील, धनगोंडा पाटील, बाहुबली इसराण्णा, गौतम पाटील हे नेतृत्व करीत आहेत.
दोन्हीही आघाड्यांकडून विकासकामांची आश्वासने मतदारांना दिली जात आहेत; परंतु स्थानिक समीकरणे कोणाच्या पारड्यात मते टाकतात, यावरच विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत. मतदार कोणत्या आघाडीला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
* एकूण प्रभाग - सहा * एकूण मतदान - ६३८९ * एकूण सदस्य संख्या - १७