...तर धार्मिक विधी कोण करणार?

By Admin | Updated: July 2, 2015 00:45 IST2015-07-02T00:37:55+5:302015-07-02T00:45:06+5:30

मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया : मुस्लिमांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

... who will do the ritual? | ...तर धार्मिक विधी कोण करणार?

...तर धार्मिक विधी कोण करणार?

कोल्हापूर : धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलांना त्यांच्या हक्कांपासून, तसेच शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारमधील अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत असून, मदरशांमधील मुलांना आता शाळाबाह्य ठरविणे, हा त्याचाच एक भाग असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम समाजातून व्यक्त होत आहे. मदरसा बंद पडले, तर समाजातील धार्मिक विधी कोण करणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कोणती भूमिका घ्यावी, याबाबत १६ जुलैला चॉँद कमिटीच्या बैठकीत ठरविले जाईल, असेही सांगण्यात आले.
शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या गोष्टी मदरशांमधून सुरू केल्या आहेत. मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासंदर्भातील सरकारचे धोरण चुकीचे असल्याचा दावा समाजातील जाणकारांकडून करण्यात येतो. मदरशांमधील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच बाह्य जगातील सायन्स, गणित, भाषा, आदी विषय शिकविले जातात. भाषेमध्ये मराठी, हिंदी व उर्दू शिकविली जाते. उर्दू शिकायची असेल, तर कमीत कमी १८० विद्यार्थी पाहिजेत. तरच एका शिक्षकाला वेतन देण्यात येते. खुल्या शाळेतून उर्दू शिकवायला शिक्षक मिळत नाहीत.
याबाबत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सांगितले की, मुस्लिम समाजातील केवळ एक टक्का मुले मदरशांमध्ये शिक्षण घेतात. त्यातही अनाथ, गरीब मुलांचा समावेश असतो. अन्य मुले ही खुल्या शाळेतूनच शिक्षण घेतात. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला, तर राज्य सरकारकडून मदरशांसाठी चार कोटींचा निधी मंजूर केला जातो, प्रत्यक्षात १४-१५ लाख रुपयेच दिले जातात. त्यामुळे ८० टक्के मदरसांना सरकारची मदतच मिळत नाही.
एकीकडे उर्दू शिक्षक द्यायचे नाहीत आणि दुसरीकडे मदरशांमधील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरवायचे, हे सरकारचे धोरण चुकीचे आहे.
मुस्लिम समाजात धार्मिक विधी केले जातात. या विधींचे शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. लग्नाचे विधी, नमाज पठण, इस्लामचे तत्त्वज्ञान हे खुल्या शाळेत शिकविले जात नाहीत. ते शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. जर मदरशांमधील विद्यार्थी शाळाबाह्य ठरविले, तर मदरसा बंद होतील; मग धार्मिक विधी करायला धर्मगुरू कसे मिळतील? असा सवाल शिरोली येथील मदरशाचे विश्वस्त कादर मलबारी यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर जिल्ह्यात १२ मदरसे
कोल्हापूर जिल्ह्यात १९७८ पासून मदरशांची संकल्पना अस्तित्वात आहे. उदगाव येथे प्रथम मदरसा सुरू झाले. सध्या उदगाव येथे २, शिरोली १, आजरा ३, चंदगड २ , इचलकरंजी २, आळते १, कुरुंदवाड येथे १, असे मदरसा आहेत.

उच्चपदस्थ अधिकारी
मदरशांमध्ये शिक्षण घेणारी मुलं पुढे बाह्य जगातील विविध क्षेत्रांतील शिक्षण घेतात. स्पर्धा परीक्षेला बसतात. उत्तर प्रदेशातील आजमगढचे मौलाना वशीऊर रहेमान हे २००८ मध्ये झालेल्या परीक्षेत ४२२ क्रमांकाच्या रॅँक ने आयकर आयुक्त बनले आहेत. रहेमान यांनी दारुल उलूम देवबंद दिल्ली मदरसा येथे शिक्षण घेतले आहे. अशी अनेक मुले सध्या देशभरात उच्चपदस्थ अधिकारी आहेत, अशी माहिती कादर मलबारी यांनी दिली.

Web Title: ... who will do the ritual?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.