जे निसर्गदत्त, ते सर्वांच्या मालकीचे
By Admin | Updated: February 7, 2015 00:06 IST2015-02-06T23:59:42+5:302015-02-07T00:06:16+5:30
बी. जी. कोळसे-पाटील : विद्यापीठात ‘समन्यायी पाणीवाटप व सामाजिक न्याय’ चर्चासत्र

जे निसर्गदत्त, ते सर्वांच्या मालकीचे
कोल्हापूर : जे-जे निसर्गदत्त ते-ते सर्वांच्या मालकीचे असले पाहिजे. त्यावर सर्वांचा हक्क आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे, ही मूलभूत भूमिका अंगिकारणे आवश्यक आहे. पाणीवाटपाचा प्रश्न हा केवळ पाण्याचा नसून त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र अधिविभाग आणि भारती विद्यापीठाच्या ‘समन्यायी पाणीवाटप व सामाजिक न्याय’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, तर डॉ. भारत पाटणकर, चिकोत्रा प्रकल्पाचे प्रणेते आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.पाणीवाटपाच्या सामाजिक न्यायाच्या बाजूबाबत कोळसे-पाटील म्हणाले, समग्राची जाणीव झाल्याशिवाय त्यातील काही अंशांवर काम करणे अशक्य असते. लोकशाही व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक, राजकीय समता अभिप्रेत असताना आपण विषमतेविरुद्ध लढायचेच विसरलो. त्यातून अखिल मानवजातीचे कल्याण हा शिक्षणाचा मूळ हेतू साध्य झाला का, असा प्रश्न पडतो. डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, पाणी ही वित्तीय वस्तू (इकॉनॉमिक गुड) आहे, अशी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी केल्यास सुयोग्य व्यवस्थापनाची गरज अधोरेखित होते. त्यामुळे त्याचे केवळ समन्यायीच नव्हे, तर त्या बरोबरीने कार्यक्षम वाटप होणे अत्यावश्यक आहे. पाण्याचे प्रमाण वेगाने घटत असून येत्या ५० वर्षांत जगभर पाणीटंचाई होण्याची चिन्हे आहेत. डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यघटनेने दिलेला जीवनाचा आणि जीविकेचा अधिकार विचारात घेता नागरिकांना किमान आवश्यक पाणी मिळणे गरजेचे आहे. स्थानिकतेसह व्यापक पद्धतीने या धोरणाचा विचार झाल्यास त्याचे खरे लाभ प्राप्त होतील.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, पावसाचे पाणी आणि भूगर्भातील पाणी या दोहोंच्या नियोजनाची मोठी गरज आहे. पावसाचे दहा टक्के पाणी जमिनीत मुरते आणि ९० टक्के पाणी विविध प्रवाहांतून वाहून जाते. या दहा टक्के मुरणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे. पाण्याचे वितरण हा राष्ट्रीय नियोजनाचा भाग असावा.
चर्चासत्रास संपतबापू पाटील, प्रा. प्रदीप पुरंदरे, संपतराव देसाई, डॉ. बी. टी. लावणी, कल्पनाताई साळुंखे आदी उपस्थित होते. प्रा. आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. जगन कराडे यांनी आभार मानले.
छोटासा तरीही ज्वलंत भाग
देशातील साठ कोटी दलित, आदिवासी, कष्टकरी जनतेच्या कल्याणाचे नियोजन आपल्याकडे नाही. या सर्व समाजाच्या जगण्याचे प्रश्न घेऊन लढण्याची गरज आहे. समन्यायी पाणीवाटप हा त्या लढ्याचा एक छोटासा तरीही ज्वलंत भाग आहे, अशा शब्दात समन्यायी पाणीवाटपाचे महत्त्व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी यावेळी विषद केले.