प्रामाणिक शेतकऱ्यांचे अनुदान, वीज बिल माफी कोठे गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:34+5:302021-02-05T07:03:34+5:30
कसबा सांगाव : प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, वीज बिल माफीच्या सरकारने ...

प्रामाणिक शेतकऱ्यांचे अनुदान, वीज बिल माफी कोठे गेली
कसबा सांगाव : प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, वीज बिल माफीच्या सरकारने घोषणा केल्या. मोठमोठे फलक लावले, पेढे वाटले. वर्ष होत आले, शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या पदरात अजून काहीच पडलेली नाही. कुठे गेल्या त्या घोषणा, पेढे व फलक? असा संतप्त सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी उपस्थित केला.
कसबा सांगाव, ता. कागल येथे मगदूम मळा येथे झालेल्या शिवार संवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून घाटगे यांना स्थळापर्यंत आणले व शेतकऱ्यांनी भाजीपाला भेट देऊन त्यांचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नव्हती. त्यासाठी मोर्चा काढला. राज्यपालांना निवेदने दिली. यानंतर शासनाने 50 हजार रुपये अनुदान जाहीर केले. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा करूनसुद्धा ती परत भरण्यास सांगितले जात आहेत. या घोषणाची आठवण करून देण्याची गरज आहे. सरकारने याबाबतीत लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाबगोंडा पाटील, भीमगोंडा टेळे, भीमराव मगदूम, लखन हेगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत बाबासाहेब मगदूम यांनी केले, तर आभार शाहू साखर कारखान्याचे संचालक बाॅबी माने यांनी मानले.
छायाचित्र- .
1) कसबा सांगाव येथील शिवार संवाद कार्यक्रमात समरजित घाटगे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते भाजीपाला टोपरी देऊन करण्यात आला. 2) कसबा सांगाव येथे आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले.