साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:16 IST2021-12-20T16:16:17+5:302021-12-20T16:16:48+5:30
मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात भंडावून सोडले. या प्रश्नांचे नेमके उत्तर अर्ज भरून घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मात्र नव्हते.

साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : साहेब, मॅडम, आम्ही अर्ज भरून पंधरा दिवस झाले. अजूनही ऑनलाईनवर पेंडिंग असेच दिसत आहे. पुढे काय करायचे? अनुदान मंजूर झाल्यानंतर इतर नातेवाईकांचा नाहरकत दाखल घ्यायचा का?, एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा भरता येतो का? असे प्रश्न विचारून कोरोनाने मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात भंडावून सोडले. या प्रश्नांचे नेमके उत्तर अर्ज भरून घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मात्र नव्हते.
सरकारने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी कोरोनाने मयत झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश काढला. यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. अर्ज भरण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर १०० ते २०० रुपयांपर्यंत त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत, म्हणून महापालिकेतर्फे शुक्रवारी शहरातील चार ठिकाणी मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.
सासणे ग्राऊंडजवळील निवडणूक कार्यालयातील शिबिरात भेट देऊन अर्ज भरण्यासाठी आलेल्या नातेवाईकांशी थेट संवाद साधला. त्यावेळी अनेक नातेवाईक गोंधळलेले दिसले. अर्ज भरलेल्या दहा जणांशी बोलल्यानंतर, एकाने अनुदान मिळाल्याचे सांगितले. उर्वरितांनी, पेंडिंग मॅसेज पाहूनच समाधान मानावे लागत असल्याचे स्पष्ट केले.
झेरॉक्स अपलोड केल्यास विलंब
ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्स अपलोड केल्यास त्याची पडताळणी होते. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान मिळते. यास विलंब लागतो. एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा भरता येत नाही. एकपेक्षा अधिक वारस असल्यास जवळचा आणि पहिला जो अर्ज भरेल, त्यांचाच अर्ज दाखल होतो. आता अनुदान जमा झालेल्यांच्या मतानुसार इतर वारसांचा नाहरकत दाखला घेण्याची गरज नाही
माझी आजी कोरोनाने मयत झाली. मी नातू म्हणून ३ डिसेंबरला अनुदानासाठी अर्ज भरला. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली. त्यानंतर १५ डिसेंबरला माझ्या खात्यावर ५० हजारांचे अनुदान जमा झाले. - महेश कापसे, कसबा बावडा
मी माझा मित्र महेश यांच्यासोबतच ३ डिसेेंबरला ऑनलाईन अर्ज भरला आहे. अर्ज भरताना काही कागदपत्रांच्या झेरॉक्स अपलोड केल्या. मला अजूनही अनुदान मिळालेले नाही. केवळ पेंडिंग मॅसेज आला आहे. - विजय सूर्यवंशी, कसबा बावडा
वडील कोरोनाने मयत झाल्याने मी मुलगा म्हणून पंधरा दिवसांपूर्वी ऑनलाईन अर्ज भरला. त्यानंतर एकदा डाॅक्युमेंट मिसिंग असा मेसेज आला. काही दिवसांनी पेंडिंग म्हणून मेसेज आला. यासंबंधी सरकारी यंत्रणेकडे विचारणा केल्यानंतर, कोणाकडूनही नेमके उत्तर मिळत नाही. - संदीप पाटील, मडिलगे खुर्द