आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते...तीन वर्षांच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारांच्या वितरणासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:35 IST2017-09-28T20:34:00+5:302017-09-28T20:35:04+5:30

When the health department wakes up ... preparations for the distribution of three-year-old Anandibai Joshi awards | आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते...तीन वर्षांच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारांच्या वितरणासाठी तयारी

आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते...तीन वर्षांच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारांच्या वितरणासाठी तयारी

ठळक मुद्देएक कोटी रुपयांची तरतूदआदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
समीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ देण्यासाठीची तयारी या विभागाने सुरू केली आहे.

दहा वर्षांपूर्वी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावे आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालय पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्था आणि खासगी संस्थांनाही या योजनेतून पुरस्कार देण्यात येतात.तसेच खासगी स्त्री व पुरुष डॉक्टर, शासकीय स्त्री व पुरुष डॉक्टर, आदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक २५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतात.

महाराष्ट्राच्या अवाढव्य आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगले काम करणारे डॉक्टर आणि संस्थांना यातून प्रोत्साहन मिळावे, या हेतूने या पुरस्कार योजनेची सुरुवात करण्यात आली.मात्र गेली दोन वर्षे या पुरस्कारांचे वितरणच केले गेलेले नाही. मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्यापासून ते वेगवेगळी कारणे सांगत या आरोग्य संस्थांना आणि डॉक्टरांना पुरस्कार देणेच राहून गेले आहे. आता यंदा आरोग्य विभागाला एकदम जाग आली असून २०१५-१६, २०१६-२०१७ आणि यंदाचा २०१७-२०१८ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

शासनाने २६ सप्टेंबर रोजी आदेश काढून यासाठीच्या परीक्षण समितीची व त्यातील अशासकीय सदस्यांचीही नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांबरोबरच डॉ. ए. पी. खाडे, डॉ. मधुसूदन कर्नाटकी, डॉ. गो. सी. चिंधे आणि विलास देशपांडे यांचा या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
 

पुरस्कार २० लाखांचे; तर ९८ लाखांचे बजेट!
या तीन वर्षांचे रोख रकमेचे पुरस्कार देण्यासाठी सुमारे २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र याचा योजनेची माहिती देण्यापासून ते पुरस्कार वितरण समारंभापर्यंतचा सर्व खर्च एकत्रित करता, ते एकूण बजेट ९८ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २० लाखांचे पुरस्कार आणि ते वितरित करण्यासाठी आणि स्पर्धा घेण्यासाठी ८० लाख रुपये खर्च असे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.

 

Web Title: When the health department wakes up ... preparations for the distribution of three-year-old Anandibai Joshi awards