शिवाजी कला-क्रीडा मंडळाचे उल्लेखनीय काय
By Admin | Updated: September 5, 2014 00:20 IST2014-09-05T00:18:30+5:302014-09-05T00:20:42+5:30
कुरुकलीत ४९ वर्षांची परंपरा : सामाजिक, शासकीय उपक्रमांत सहभार्ग

शिवाजी कला-क्रीडा मंडळाचे उल्लेखनीय काय
मुरगूड : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजाभिमुख उपक्रम राबवून लोकमान्य टिळकांचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे; पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन गेल्या ४९ वर्षांपासून कुरुकली (ता. कागल) येथील शिवाजी कला-क्रीडा मंडळाने मैदानी व मर्दानी खेळांसह ग्रामस्वच्छता अभियानातही उल्लेखनीय काम करून वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
मुरगूड परिसरातील हंबीरराव पाटील यांनी १९६५ मध्ये या मंडळाची स्थापना केली. सुरुवातीस संपूर्ण गावातील तरुणांनी या मंडळाच्या नावाखाली एकत्र येऊन कबड्डी खेळाची सुरुवात केली. गावामध्ये स्पर्धांचे यशस्वी नियोजन करून राष्ट्रीय पातळीपर्यंत या मंडळाने कुरुकलीचे नाव उज्ज्वल केले. याच वर्षी पाटील यांनी पुढाकार घेऊन गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. या मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये, सार्वजनिक उपक्रमांमध्ये कधीच खंड पडला नाही.
ग्रामस्वच्छता अभियानामध्ये या मंडळाचे काम उल्लेखनीय आहे. ‘लेक वाचवा’ अभियानाला बळकटी देण्यासाठी मुलींच्या आई-वडिलांचा सत्कार, मर्दानी खेळ, लेझीम खेळात प्रावीण्य, वृक्षारोपण, गावातील गरजूंना विविध शासकीय योजना लागू करण्यासाठी प्रयत्न, युवकांसाठी रोजगार मेळावे, नेत्रतपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती अभियान, गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरण, ग्रंथ प्रदर्शन, दरवर्षी विजया दशमी दसऱ्याला घोडेश्वर यात्रेसाठी महाप्रसाद, आदी उपक्रम मंडळ राबवीत आहे.
यावर्षी गणपती आगमनापासून रोज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन, उद्या, शुक्रवारी अशोक पाटील कौलवकर यांचे प्रवचन व कीर्तन, रविवारी महाआरतीचे आयोजन केले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नारायण शेटके यांनी दिली. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सदाशिव पाटील, सचिन बाचणकर, शुभम चौगले, प्रथमेश दाभोळे या प्रमुखांसह मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.