कोल्हापूर : मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग होणारच असे सांगितले. या महामार्गास नागपूरपासून सांगलीपर्यंत विरोध नाही. पण कोल्हापूरचा विरोध आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांची चर्चा करून पर्यायी मार्ग काढू असे वक्तव्य केले. याचा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, यवतमाळ व वर्धा सोडून इतर दहा जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी २०२४ पासून गेले दहा महिने आंदोलने शेतकरी व नागरिक करत आहेत. फडणवीस हे गृहमंत्री होते. त्यांना या सर्व आंदोलनाची खडानखडा माहिती असेल. महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांनी खोटे बोलू नये. गेले दहा महिने शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही.कोल्हापूरमधील सहा तालुके वगळण्याचा आदेश महायुती सरकारने काढला होता. याचा साधा उल्लेख त्यांनी आपल्या वक्तव्यात केला नाही. शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक, करदात्या जनतेचा पैशाचा चुराडा करणारा तर आहेच पण त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे व तो पर्यावरणविरोधी आहे. त्यामुळे तो शेतकरी व नागरिक रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा इशारा पत्रकात दिला आहे.
कोल्हापूरकरांची समजूत काढू, पण शक्तिपीठ होणार; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:38 IST