जिल्ह्यात २० विरंगुळा केंद्रे उभी करू

By Admin | Updated: January 24, 2015 00:07 IST2015-01-24T00:04:40+5:302015-01-24T00:07:56+5:30

चंद्रकांत पाटील : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

We will set up 20 unique centers in the district | जिल्ह्यात २० विरंगुळा केंद्रे उभी करू

जिल्ह्यात २० विरंगुळा केंद्रे उभी करू

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांविषयी असणारी तळमळ आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावे विरंगुळा केंद्राच्या उभारणीद्वारे दाखवून दिली आहे. आगामी काळात जिल्ह्यात अशाच प्रकारची २० ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे उभी करू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. टाऊन हॉल येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी समन्वयाद्वारे एकमेकांप्रती आदर राखावा, बदलत्या काळानुसार आपली मानसिकता बदलावी आणि सुखी, खुशाल जीवन व्यतीत करावे. शिवसेनाप्रमुखांचे विचार सध्याच्या युवापिढीसह सर्वांनीच आचरणात आणावेत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राप्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराना एका ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे योजले आहे. त्यानुसार जिल्ह्यात वीस केंद्रे स्थापन केली जातील.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या नावे ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र उभे केल्याचा आपणास अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक संघटना विविध लोकप्रतिनिधींकडे आपल्या समस्या मांडत होते; परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. गेल्यावर्षी त्यांनी माझी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून या विरंगुळा केंद्राची स्थापना केली आहे. यापुढेही अशाच प्रकारचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले जाईल.
जिल्हाधिकारी राजाराम माने म्हणाले, समाजाची उत्क्रांती होत असताना माणसांचे आयुष्यमान वाढत असून, ज्येष्ठ नागरिकांनी वयोवृद्ध बनून न राहता आमदार क्षीरसागर यांनी विरंगुळा केंद्राद्वारे दिलेल्या संधीचा फायदा घेत कृतिशील बनण्याचे आवाहन केले.
यावेळी मानसिंगराव जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, उपअभियंता डी. एम. उगीले, शाखा अभियंता डी. जी. कल्याणकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. विजय कुलकर्णी, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, माजी उपमहापौर उदय पवार, माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर, अनिल पाटील, जयवंत हारूगले, रमेश खाडे, भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, महिला आघाडी संघटक पूजा भोर, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: We will set up 20 unique centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.