मेस्सीसोबत फुटबॉल खेळलो... आमचे स्वप्न साकार झाले; कोल्हापूरच्या पाच फुटबॉलपटूंच्या भावना
By सचिन यादव | Updated: December 16, 2025 19:40 IST2025-12-16T19:39:54+5:302025-12-16T19:40:36+5:30
मेस्सी यांच्या हस्ते या खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान केली

मेस्सीसोबत फुटबॉल खेळलो... आमचे स्वप्न साकार झाले; कोल्हापूरच्या पाच फुटबॉलपटूंच्या भावना
सचिन यादव
कोल्हापूर : अर्जेंटिना आणि आंतरराष्ट्रीय महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक. त्याला पाहण्याचे आणि भेटण्याचे एक मोठे स्वप्न होते. आतापर्यंत केवळ आम्ही त्याला टीव्हीवर पाहत होतो. त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमचे स्वप्न साकार झाले. अविश्वसनीय कौशल्य आणि गोल करण्याच्या क्षमता, कसब शिकण्याची संधी फुटबॉलच्या बादशाहकडून आम्हाला मिळाली, अशा भावना कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र हायस्कूलचा आर्यन सचिन पोवार, आराध्य नागेश चौगले, सेंट झेव्हिअर्स हायस्कूलचा रुद्र मकरंद स्वामी आणि कणेरी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलची दिव्या सतीश गायकवाड, साक्षी संदीप नावळे यांना फुटबॉलपटू मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली. राज्य सरकारचा क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रॉन्सफॉर्मेशन, सिडको, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फ (विफा) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम झाला.
राज्यात फुटबॉलचा विकास, प्रचार व प्रसारासाठी राज्य सरकारतर्फे ‘स्कॉलरशिप ऑफ प्रोजेक्ट महादेवा’ प्रकल्पासाठी कोल्हापुरातील तेरा वर्षांखालील पाच खेळाडूंची निवड झाली होती. राज्यस्तरीय निवड चाचणीतून ३० मुले आणि ३० मुलींचा समावेश होता. मेस्सी यांच्या हस्ते या खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान केली.
कोल्हापुरातून एक हजारांवर फुटबॉलप्रेमी
अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना पाहण्यासाठी कोल्हापुरातून एक हजारांवर फुटबॉलप्रेमी उपस्थित राहिले. त्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. काही जण शनिवारी मुंबईत दाखल झाले.
कोल्हापूरच्या मुलांनी केला नमस्कार
वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी मेस्सी ज्यावेळी उतरला त्यावेळी मैदानातील अनेकांनी त्यांच्या सोबत शेकहँड केले. मुले आणि मुलींच्या संघात समावेश असलेल्या कोल्हापूरच्या मुले आणि मुलींनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्या वेळी मेस्सींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
मुलीही फुटबॉल खेळात मागे नाहीत. राज्यातून ३० मुलींत माझी निवड होणे, हे मी माझे भाग्य समजते. त्याहूनही मेस्सी यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले, हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. - दिव्या गायकवाड, श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल
माझा आवडता खेळाडू प्रत्यक्ष पाहायला आणि त्यांच्यासोबत खेळायला मिळाले, हे मला पडलेले स्वप्नच पूर्ण झाले. राज्याच्या संघात निवड होण्यासाठी ‘विफा’कडून मिळालेल्या संधीने करिअरचा नवा मार्ग खुला केला. - आर्यन पवार
राज्यातून ३० मुले आणि ३० मुली निवडण्याचे मोठे कसब होते. त्यातून कोल्हापूरची पाच मुलांची निवड झाली, ही अभिमानाची बाब आहे. ‘विफा’ आणि ‘केएसए’च्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले. मेस्सीला प्रत्यक्षात भेटलो ही आठवण आयुष्यभर अविस्मरणीय राहील. - निखिल कदम, मुख्य निवडकर्ता, महादेवा
कोल्हापूरच्या मुलांना खेळण्यास संधी मिळाली ही एक मोठे यशस्वी पाऊल आहे. ‘विफा’ने त्यासाठी पूर्णपणे तांत्रिक सहकार्य केले. राज्यातील फुटबॉल खेळाला एक नवी दिशा मिळाली आहे. - मालोजीराजे, उपाध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन
खेळाडूंच्या राज्यस्तरीय निवड चाचणीत विफा आणि कोल्हापूरचे सिलेक्टर, ‘केएसए’ने मार्गदर्शन केले. या संधीमुळे कोल्हापूरचे फुटबॉलपटू भविष्यात राज्याच्या आणि देशाच्या महिला फुटबॉल संघात निश्चितच चमकतील. - मधुरिमाराजे, सदस्या, भारतीय फुटबॉल फेडरेशन महिला समिती