आम्ही साऱ्या कमळामावशी...

By Admin | Updated: February 23, 2015 23:57 IST2015-02-23T23:38:45+5:302015-02-23T23:57:59+5:30

आठवणींचा जागर : माणूस म्हणून जगण्याचा निर्धार

We all have lotus ... | आम्ही साऱ्या कमळामावशी...

आम्ही साऱ्या कमळामावशी...

सांगली : संग्राम संस्थेच्या कार्यकर्त्या असणाऱ्या ज्या कमळाबाई पानी यांनी सर्वांना माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली... अन्यायाविरोधात लढण्याचे बळ दिले.... सतत संस्थेच्या प्रगतीचा ध्यास घेतला... सर्वांशी मैत्रिपूर्ण संबंध जोडून माणुसकी जपली, त्यांचा वारसा पुढे न्यायचा असेल, तर भविष्यकाळात प्रत्येकाने कमळामावशी म्हणूनच कार्यरत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा आज सोमवारी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ‘आठवणींचा जागर’मध्ये व्यक्तकेली. सांगलीसह राज्यभरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या कमळाबाई पानी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणी जागविण्यासाठी संग्राम, व्हॅम्प, मुस्कान, कसम, विद्रोही महिला मंच, मित्रा, नजरिया संघटनेतर्फे गोकुळनगर येथे आज सोमवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार हरिष यमगर होते. प्रारंभी कमळाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. वसंत भोसले म्हणाले, गोकुळनगर येथील कमळाबार्इंचे कार्य ‘रोल मॉडेल’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच येथील कार्याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अनेकजण येत असत. तुम्हा सर्वांना माणूस म्हणून जगण्यास शिकविणाऱ्या कमळामावशींचे कार्य पुढेही त्याच ताकदीने सुरू ठेवणे ही त्यांना आदरांजली ठरेल.  हरिष यमगर म्हणाले, कमळामावशी नेहमी सामान्यांसाठी कार्यशील होत्या. गोकुळनगर येथील अनेक महिलांना खंबीरपणे बोलायची ताकद त्यांच्यामुळेच मिळाली. त्यांनी कधीही गैरमार्गाला थारा दिला नाही. तोच वारसा तुम्हीही पुढे चालविणे गरजेचे आहे. संग्राम संस्थेच्या मीना शेषू यांनी, कमळामावशींनी त्यांचे अनुभवाचे बोल आम्हाला सांगितल्यामुळेच आम्हाला नवे काही शिकता आले. तसेच त्यांनी सर्वांनाच माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी बेंगलोर येथील नॅशनल नेटवर्क आॅफ सेक्स वर्कर्सच्या मुक्ता, कर्नाटक सेक्स वर्कर्सच्या भारती, मुस्कान (पुणे) येथील काजल, नगरसेवक शेवंता वाघमारे, उत्तम कांबळे, सपना शिंदे, भीमव्वा गोल्हार, दुर्गा पुजारी, शबाना काझी, निलव्वा सिध्दरेड्डी, राजू नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: We all have lotus ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.