शिराळी तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: February 23, 2015 00:17 IST2015-02-23T00:07:22+5:302015-02-23T00:17:06+5:30
पीक पद्धतीत बदलाचा परिणाम : कमी पावसाचाही फटका; कलही बदलला...

शिराळी तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर
विकास शहा -शिराळा तालुका शिराळी मासाड किंवा जोंधळी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र हा तांदूळ हळूहळू कालबाह्य होऊ लागला आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण व जादा उत्पादन देणारी पिके शेतकरी घेऊ लागल्याने या तांदळाचे उत्पादन अल्प होऊ लागले आहे. परिणामी हे वाण संपण्याच्या मार्गावर आहे.
शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात कमी पाऊस, ओसाड माळरान, तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे दोन्ही विभागात वेगवेगळ्या पद्धतीने भातपिके घेतली जातात. २३ हजार हेक्टर खरीप क्षेत्र असून, त्यामध्ये १३ हजार हेक्टर क्षेत्र फक्त भात पिकाचे आहे. शिराळी तांदळात मासाड, दोडगा, जया, रत्ना १, वडगाव ४८ व जोंधळी या जातींचा-वाणांचा समावेश होतो. शिराळी तांदळाचे उत्पादन कमी होते. मासाड तांदूळ खाण्यास चविष्ट असतो. याचे पोहेही केले जातात. जोंधळी तांदूळ जोंधळ्यासारखा गोलाकार असतो. या तांदळाचा भात घरात शिजत असल्यास रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही त्याचा सुवास येतो. इतर तांदळामध्ये हा तांदूळ मूठभर टाकला तरी त्याचा वास पसरतो. जोंधळी तांदूळ बासमतीपेक्षा जादा वासाचा तसेच खाण्यास चविष्ट असतो. ‘तुला काय पंचायत?’, ‘काळी कंगणी’ आदी वाणही प्रसिद्ध आहेत. अलीकडे त्यांची जागा रत्ना २, इंद्रायणी, बासमती, सोना, सोनम, रत्नागिरी २४ आदी तांदळाच्या जातींनी घेतली आहे. या जाती संशोधकांनी, शासनाच्या कृषी विभागाने आणि कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्यामुळे कमी पाऊस, जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळल्याने जुने बियाणे नामशेष होत आहे.
धूळवाफ पद्धतीने तसेच लावण पद्धतीने भाताची पेरणी केली जाते. कमी उत्पन्न मिळत असल्याने जोंधळी तांदळाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी तो ७० ते ७५ रुपये किलो दराने मोजक्याच शेतकऱ्यांकडे मिळतो. त्यासाठी शिराळा, कोकरूड, चरण, आरळा, शेडगेवाडी, सागाव येथील आठवडा बाजारात शोध घ्यावा लागतो. घाऊक व्यापारी यामध्ये इतर तांदूळ मिसळून विकतात, त्यामुळे मूळ जोंधळी तांदळाची चव चाखायला मिळत नाही. .
प्रतिकूल परिस्थितीने
नाराजी
सुधारित बियाणे, त्यातही जादा उत्पादन मिळणाऱ्या बियाणांकडे शेतकरी वळला आहे. मजुरांचा तुटवडा, मजुरीचे वाढते दर याचाही परिणाम झाला आहे. त्यातच हे पूर्ण पीक पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी हे पीक घेण्यास नाखूष आहेत. शिराळी तांदळास बाजारपेठेत मागणी असली, तरी त्याच्या उत्पादनाकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे ‘शिराळी तांदूळ’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.