राजेंद्रनगरात अनधिकृत झोपड्यांवर वरवंटा

By Admin | Updated: March 20, 2016 01:06 IST2016-03-20T00:46:37+5:302016-03-20T01:06:10+5:30

महापालिकेची कारवाई : मोठा पोलिस बंदोबस्त; मोजणी करून २८२ झोपड्यांवर कारवाई सुरू

Wavata on unauthorized huts in the Rajendranagar | राजेंद्रनगरात अनधिकृत झोपड्यांवर वरवंटा

राजेंद्रनगरात अनधिकृत झोपड्यांवर वरवंटा

कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरात विविध कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अनधिकृत झोपड्या शनिवारपासून पोलिस बंदोबस्तात काढण्याची कारवाई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली. शनिवारी दुपारपर्यंत सुमारे ५० हून अधिक झोपड्या काढण्यात आल्या. या कारवाईवेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिस बंदोबस्त असल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.
राजेंद्रनगर परिसरात केएमटी बस टर्मिनन्स, माध्यमिक शाळा, तसेच चाळीस फुटी डी. पी. रोड यासाठी आरक्षित जागा आहेत. त्याच्या आसपासच्या परिसरात शहरातील अन्य भागांतील विस्थापित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना कायमस्वरूपी घरेही बांधून देण्यात आली आहेत; परंतु पुन्हा याच लोकांनी बस टर्मिनन्स, माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून पत्र्यांच्या शेडवजा झोपड्या उभ्या करून त्यामध्ये गोदामे केली होती. विशेष म्हणजे, रस्त्यातही त्यांनी अतिक्रमण केले होते. महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येताच त्या भागाची पाहणी करून अनधिकृत झोपड्याची मोजणी केली होती.
मोजणीवेळी माध्यमिक शाळेच्या जागेवर १३२, डीपी रोडवर ११३, केएमटीच्या जागेवर ३१, तर रहिवाशी क्षेत्रात ६ अशा झोपड्या अनधिकृत उभ्या राहिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या झोपड्या निष्काषित करण्याचा निर्णय विभागीय कार्यालयातर्फे घेण्यात आला होता. शनिवारी सकाळी उपशहर अभियंता एस. के. माने आवश्यक तो पोलिस बंदोबस्त, वाहने, डंपर, जेसीबी अणि सुमारे १०० हून अधिक कामगार असा फौजफाटा घेऊन राजेंद्रनगर परिसरात गेले. आतील महत्त्वाचे साहित्य काढून घेण्यात आल्यानंतर झोपड्या तोडण्यास सुरुवात करण्यात आली. बघता बघता एकापाठोपाठ एक पत्र्याची शेड जेसीबीच्या धक्क्याने जमीनदोस्त झाली.

Web Title: Wavata on unauthorized huts in the Rajendranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.