वारणा नदी पात्रात पाणीपुरवठा सुरळीत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:18+5:302021-05-09T04:24:18+5:30
किणी : चांदोली धरणातून वारणा नदीत सोडण्यात येणारे पाणी खंडित करण्यात येत असल्याने नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना पाणीटंचाईस ...

वारणा नदी पात्रात पाणीपुरवठा सुरळीत करावा
किणी : चांदोली धरणातून वारणा नदीत सोडण्यात येणारे पाणी खंडित करण्यात येत असल्याने नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता पाहता वारणा नदीचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा पाटबंधारे विभागाला कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांच्या वतीने देण्यात आले.
गेली काही दिवस चांदोली धरणातील पॉवर हाऊसच्या दुरुस्तीसाठी धरणांतून वारणा नदी पात्रात पाणी सोडण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दोनवेळा नदीचे पात्र कोरडे पडून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम पिकांच्या पाणीफेरीवर होत आहे. वारणा काठावरील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना भेटून जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्यावतीने निवेदन देऊन यापुढे अशाप्रकारे धरणातून वारणा नदी पात्रात पाणी सोडण्याचे थांबवू नये, अशी मागणी केली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी यापुढे असा प्रकार होणार नाही याचे आश्वासन दिले.
फोटो ओळी .. वारणा नदीची वारंवार कमी होत असलेली पाणीपातळी सुरळीत करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना भेटून जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले.