सहा गावांतील पाणी प्रश्न भीषण
By Admin | Updated: December 22, 2014 00:23 IST2014-12-22T00:22:54+5:302014-12-22T00:23:56+5:30
भोगावती नदीचे प्रदूषण : प्रदूषण मंडळाचे अधिकारीही बुचकळ्यात

सहा गावांतील पाणी प्रश्न भीषण
कोल्हापूर : दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत काल, शनिवारी सायंकाळनंतर हळदी (ता. करवीर) येथील बंधाऱ्यापर्यंत मिसळले. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. परिणामी, परिते, हळदी, कुरुकली, कोथळी, देवाळी, आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. याची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज, रविवारी पाहणी केली. प्रथमदर्शनी पाणी कशामुळे दूषित झाले आहे, हे त्यांनाही समजू शकलेले नाही. त्यामुळे नेमके कारण शोधण्यासाठी दूषित पाणी, मृत मासे यांचे नमुने घेतले आहेत.
भोगावती नदीत पाणी कमी असल्यामुळे हळदी बंधाऱ्यास बरगे घातले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाणी व नदीच्या दोन्ही बाजूंच्या काठांची पाहणी केली. मात्र, मळीमिश्रित पाणी थेट नदीत मिसळल्याचे कोठेही निदर्शनास आले नसल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी केला आहे. दरम्यान, आज तवंग कायम राहून मासे मृत झाल्याने ते गोळा करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती.
परिते, कुरुकली, हळदी या गावांतील सांडपाणी मोठ्या प्रमाणात थेट नदीत मिसळत आहे. यामुळेही पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. मात्र, सांडपाण्यामुळे काळा तवंग आणि व्यापक प्रमाणात मासे मृत होऊ शकत नाहीत. मळीमिश्रित पाण्यामुळेच मासे मृत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात मोठा औद्योगिक प्रकल्पही नाही. मग रसायनमिश्रित पाणी आले कोठून? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या दूषित पाण्यामुळे परिते, हळदी, आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहिरीचा आधार घेतला आहे. कोथळी, कुरुकली या गावांत आज नदीवरील जॅकवेलवरून पाणीपुरवठा केला नाही. ग्रामपंचायतीने नदीचे पाणी पिऊ नये, असे आवाहन केले आहे. उद्या, सोमवारपासून मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होणार आहे. राधानगरी धरणातून नव्याने सोडलेले पाणी हळदी बंधाऱ्यापर्यंत आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आले आहे. अशा अवस्थेत बरगे काढल्यास दूषित पाणी कोल्हापूरपर्यंत येणार आहे. परिणामी, पुन्हा नदीकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, ‘प्रदूषण नियंत्रण’चे डोके सदस्य आहेत. या दोघांनीही प्रदूषणाची पाहणी केली.