कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. अधूनमधून झालेल्या सरी वगळता उघडीप राहिली. एकूणच पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी ३३.०९ फुटांवर आहे. ४१ बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे.गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, आजरा तालुका वगळता इतर तालुक्यांत पाऊस कमी झाला आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. वारणा धरणातून प्रतिसेकंद १४ हजार ७४ तर दूधगंगेतून ५६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील विसर्गामुळे नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात साधारणता फुटाने कमी झाली आहे. विविध नदीवरील ४१ बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.
दहा मार्ग बंद ..जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे विविध मार्ग बंद आहेत. यामध्ये राज्य मार्ग चार व प्रमुख जिल्हा मार्ग सहा मार्ग बंद आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
शिरढोण-कुरुंदवाड बंदएसटीच्या काही मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. तरीही शिरोळ तालुक्यातील शिरढोण ते कुरुंदवाड मार्गावरील एसटी वाहतूक बंद आहे.
‘अलमट्टी’तून १.२० लाखाचा विसर्गअलमट्टी धरणात सध्या प्रतिसेकंद १ लाख २३ हजार घनफूट पाण्याची आवक होते. त्यातून १ लाख २० हजार घनफूट विसर्ग सुरू आहे.