एस.सी आरक्षणामुळे इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:06+5:302021-02-05T07:07:06+5:30
ज्योती पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, पाचगाव : शहरापासून जवळच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्रभाग क्र. 67 रामानंदनगर-जरगनगर यावेळी अनुसूचित जाती ...

एस.सी आरक्षणामुळे इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी
ज्योती पाटील,
लोकमत न्यूज नेटवर्क,
पाचगाव : शहरापासून जवळच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्रभाग क्र. 67 रामानंदनगर-जरगनगर यावेळी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने भल्या-भल्या उमेदवारांची अखेर पंचाईत होऊन बसली आहे. या प्रभागात सलग 10 वर्षे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2000 पासून या प्रभागात आरक्षण हे सर्वसाधारणच राहिले आहे. तरीसुद्धा अनेकजण इच्छुक असून इच्छुकांनी आपापल्यापरीने पक्षनेतृत्वाकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली. कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण असणा, हे येणारा काळच ठरवेल.
जवळच असणारा प्रभाग क्र 78, रायगड कॉलनी-जरगनगर हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने व पूर्वीचा एकच असणाऱ्या या प्रभागात प्रभाग क्र. 67 रामानंदनगर-जरगनगरमधील अनेकांनी उड्या घेतल्याने येथे उमेदवारांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे. 2015 पूर्वी हे दोन्ही प्रभाग एकच असल्याने याठिकाणीही संपर्क असल्याने इच्छुक उमेदवारांची लगबग चालू आहे,
2000 मध्ये याठिकाणी दिनकर पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. 2005 मध्ये देविका जरग या निवडून आल्या होत्या, तर 2010 मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेणाऱ्या सुनील पाटील यांनी सलग 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. ते उपमहापौर देखील झाले होते.
सध्या हा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्याने याठिकाणी भाजप व ताराराणी आघाडीकडून सुनीता घोडके इच्छुक आहेत, तर काँग्रेसकडून वृषाली कदम व सतीश भाले यांच्या पत्नी इच्छुक आहेत. तसेच सिंधू शिरोळे, अर्चना चौगुले, प्रियांका कांबळे, पूजा भोपळे हे उमेदवार देखील या प्रभागातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. इच्छुकांनी आतापासूनच प्रभागात गाठीभेटीवर भर दिला आहे.
या प्रभागात गटर्स व्यवस्थित नसल्याने गटारगंगा झाल्याचे चित्र आहे. तसेच अनेक समस्यांनी हा प्रभाग ग्रासला असून अनेक सेवा-सुविधेपासून वंचित आहे. त्यामुळे याठिकाणी प्रभागाच्या समस्या सोडवणारा उमेदवार हवा असल्याचे भागातील नागरिकांतून बोलले जात आहे.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
सुनील पाटील : (राष्ट्रवादी) 1298
प्रशांत पवार : (भाजप) 1159
संदीप कदम : (काँग्रेस) 847
संजय पाटील : (शिवसेना) 316
प्रभाग क्र 67, रामानंदनगर-जरगनगर, आरक्षण अनुसूचित जाती महिला
विद्यमान नगरसेवक : सुनील पाटील, राष्ट्रवादी
प्रतिक्रिया...
विद्यमान नगरसेवक : सुनील पाटील, राष्ट्रवादी
गेल्या पाच वर्षात प्रभागात एक कोटीच्या वर अनेक विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. हा प्रभाग टँकरमुक्त केला आहे. 2017 - 18 चा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच रस्ते, गटर्स, पाईपलाईन, ओढ्यावरील पूल अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत.
सोडवलेले प्रश्न
अनेक रस्ते
प्रभागातील गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन, ओढ्यावरील पूल हॉल एल इ डी लाईट
प्रभागातील समस्या
प्रभागात अनेक समस्या असून त्यापैकी अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी वेळेवर मिळत नाही
वेळेत स्वच्छता होत नसल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जातो.
रामानंदनगर ओढ्यापासून मुख्य रस्त्याला बाजूपट्ट्या नसल्याने वाहतूक कोंडी होते. ओढ्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात पूर आला की अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसते. नागरी सुविधा केंद्र नसल्याने लोकांना शहरात जावे लागते
अंगणवाड्यांची दुरवस्था आहे
फोटो ओळ :
जाधव पार्क येथे गटर्सची दुरवस्था झाल्याने गटारीमधील पाणी इतरत्र पसरते व त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. या प्रभागात अनेक ठिकाणी अशीच समस्या असल्याने हा प्रभाग गटारगंगा झाल्याचे चित्र आहे.