सांडपाणी पुन्हा रंकाळ्यात
By Admin | Updated: November 30, 2014 00:55 IST2014-11-30T00:30:49+5:302014-11-30T00:55:06+5:30
‘प्रदूषण’कडून पाहणी : महापालिकेची कानउघाडणी

सांडपाणी पुन्हा रंकाळ्यात
कोल्हापूर : रंकाळा तलावात शाम हौसिंग सोसायटीकडून वाहणाऱ्या नाल्यातील सांडपाणी रोखण्याची उपाययोजना केल्यानंतरही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आता पुन्हा सांडपाणी तलावात मिसळत आहे. आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांनी याची पाहणी करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
कणकवलीहून कोल्हापूरकडे येत असलेल्या सूर्यकांत डोके यांना नाल्यातील मैलामिश्रित सांडपाणी तलावात मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपली गाडी थांबवून नाल्याची पाहणी करून आश्चर्य व्यक्त केले. डोके यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्याचे सांगितले. त्यावेळी कुलकर्णी यांनी ड्रेनेज लाईन चोकअप झाली असल्याने चार दिवस लागतील, तोपर्यंत सांडपाणी मिसळत राहील, असे उर्मट उत्तर कुलकर्णी यांनी दिले. तेव्हा संतप्त झालेल्या डोके यांनी कुलकर्णी यांची कानउघाडणी केली.
शाम हौसिंग सोसायटीकडून येणाऱ्या नाल्यातील सांडपाणी रोखून ते दुधाळी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकून वळविण्यात आले आहे. हे कामच तांत्रिकदृष्ट्या चुकीचे झाले असल्याने सांडपाणी पुन्हा तलावात मिसळत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काही दिवस फळ्या घालून हे सांडपाणी रोखले गेले. परंतु सांडपाणी पुढे ड्रेनेज लाईनमधून जात नसल्याचे स्पष्ट झाले.(प्रतिनिधी)