फुलेवाडीतून विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी आज रवाना
By Admin | Updated: June 30, 2014 00:08 IST2014-06-30T00:06:39+5:302014-06-30T00:08:08+5:30
संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे

फुलेवाडीतून विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी आज रवाना
प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे
‘सुख लागे करीशी तळमळ
तरी तू पंढरीशी जाये एकवेळ
मग तू अवघाशी सुखरूप होशी’
या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे सुखासाठी तळमळ करणाऱ्या प्रत्येकाने एकवेळ दीनदुबळ्यांचा नाथ व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत समजल्या जाणाऱ्या पांडुरंगाला पंढरीत जाऊन पांडुरंग चरणी लीन झाल्यास अवघाची सुखरूप होशील, ही मनाशी आस बाळगून फुलेवाडी येथील विठ्ठलपंथी सांप्रदायी मंडळाचे दोनशे वारकरी पायी दिंडीसाठी ३० जूनला पहाटे निघणार आहे.
‘लोकमत’शी बोलताना भजनी मंडळाचे अध्यक्ष महादेव मेढे म्हणाले, फुलेवाडी येथून गेली १५ वर्षे पंढरपूर येथे पायी दिंडीने वारीसाठी दरवर्षी किमान १०० ते २०० वारकरी निघतात. यावर्षी यामध्ये वाढ होणार असून, यात शिक्षित तरुणांचा भरणा मोठा आहे.
आषाढी वारीला निघाल्यानंतरचा ११ ते १२ दिवसांचा दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध असतो. वारीत पहाटे तीन वाजता महिलांचा, तर चार वाजता पुरुषांचा दिवस सुरू होतो. पहाटे काकड आरती झाल्यानंतर भजन-कीर्तन करीत, विठ्ठल नामाचे नामस्मरण करीत, मजलदरमजल करीत आगेकूच सुरू ठेवतो.
पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत व त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुक्काम ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जेवणानंतर भजन, कीर्तन, प्रवचन, अभंग अशा पद्धतीने पांडुरंगाचे नामस्मरण करीत रात्री ११ ते ११.३० पर्यंत सर्वच वारकरी एकत्र राहतात व त्यानंतर रात्री उशिरा विश्रांती घेतात. (वार्ताहर)