प्रभाग रचना होणार ‘गुगल मॅप’द्वारे

By Admin | Updated: February 8, 2015 01:06 IST2015-02-08T01:06:43+5:302015-02-08T01:06:43+5:30

राज्यातील पहिला प्रयोग कोल्हापुरात : महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू

The ward will be designed by Google map | प्रभाग रचना होणार ‘गुगल मॅप’द्वारे

प्रभाग रचना होणार ‘गुगल मॅप’द्वारे

 कोल्हापूर : महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचना संगणकाद्वारे ‘गुगल मॅप’चा आधार घेऊन करण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत राबविण्यात येणार आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी तसे आदेश दिले. कोल्हापूर व कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर २०१५ मध्ये होत आहेत. तिथे या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
मुंबईतील आयोगाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका प्रतिनिधी म्हणून उपायुक्त नितीन देसाई व कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त मधुकर आर्दंड उपस्थित होते. सध्या प्रभाग रचना कर्मचाऱ्यांकडून केली जाते. त्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात नव्हता. त्याबद्दल तक्रारीही जास्त होत्या. सत्ताधारी नगरसेवक प्रशासनावर दबाव टाकून सोयीचा प्रभाग करून घेत असत. प्रशासनही एखाद्या नगरसेवकाने त्रास दिला असल्यास त्याचा प्रभाग रचनेत काटा काढत असे. सुपाऱ्या घेऊनही सोयीची प्रभाग रचना केली जात असे. त्यामुळेच अनेकदा ही प्रक्रिया वादग्रस्त ठरत होती. अमुक भाग तमुक प्रभागात कसा गेला अशा स्वरूपाच्या तक्रारी होत.
अनेकदा भौगोलिक संलग्नताही तुटलेली असे; परंतु आता या सगळ्या तक्रारींना आळा घालणे शक्य होणार आहे. कारण या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप बंद होणार आहे. प्रभाग रचना करताना ‘गुगल मॅप’चा आधार घेतला जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया संगणकाच्या साहाय्याने करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरच विकसित केले जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना सहारिया यांनी दिल्या. त्यासाठी महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The ward will be designed by Google map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.