गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील निवृत्ती महादेव सुतार यांच्या राहत्या घराची आडे भिंत अचानक कोसळल्याने त्यांच्या कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आकुर्डे येथील मराठी शाळेजवळ निवृत्ती महादेव सुतार यांचे घर आहे. काल दुपारी १२- ३०च्या दरम्यान घरातील सर्व माणसे जेवण करून बसली असता अचानक घराच्या आडे भिंतीवरून आवाज येण्यास सुरुवात झाली. कसला आवाज येत आहे म्हणून पहाण्यास गेले असता आडे भिंतीला अचानक तडे जात असल्याचे सुतार यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी घरातील इतर माणसांना बाहेर पडण्याची सूचना केली. सर्व लोक तत्काळ बाहेर पडताच भिंत कोसळायला सुरुवात झाली.
ही भिंत कोसळल्यामुळे सुतार यांच्या घरातीत जीवनावश्यक आणि प्रापंचिक साहित्य,गॅस, तिजोरी, बेड आणि १० पोती भाताचा तट्ट्या असे सर्व साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
फोटो ओळ - निवृत्ती सुतार यांचे राहते घर कोसळले आहे.