वडगाव, वठारची चौकी अनेक दिवसांपासून बंदच
By Admin | Updated: May 19, 2015 00:21 IST2015-05-18T23:44:41+5:302015-05-19T00:21:46+5:30
उद्घाटनासाठीच उघडला दरवाजा : कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची गरज

वडगाव, वठारची चौकी अनेक दिवसांपासून बंदच
सुहास जाधव-पेठवडगाव -मोठा गाजावाजा करीत जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या दोन पोलीस चौकी बंद आहेत. वडगाव संवेदनशील, तर वठारमधून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे या दोन चौकींची गरज पोलीस प्रशासनास वाटली. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली. मात्र, या चौक्या अनेक दिवस बंद आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणार का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
अलीकडच्या काळात पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात वाढ झाली आहे. तसेच पोलीस ठाण्यावरही हल्ला झाला. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुखांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली. वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ गावे येतात. वडगाव शहराचा बाजार हा राज्यात प्रसिद्ध आहे. तसेच ३२ खेड्यांतील ग्रामस्थ भाजीपाला ते जनावरे खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. तर राष्ट्रीय महामार्ग हा पोलीस ठाण्यातील गावातून जातो. त्यामुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राबविणे हे कौशल्याचे असते. यामुळे पोलीस प्रशासनावर ताण पडतो. यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी वडगाव व वठार येथे पोलीस चौकी सुरू करण्याचे नियोजन केले. अनेक अडथळ्यांवर मात करीत पोलिसांनी दोन पोलीस चौक्या उभारल्याच ! उद्घाटनानंतर वडगावमधील पोलीस चौकी महिना-दीड महिना सुरू राहिली, तर वठार पोलीस चौकीला कुलूपच आहे. त्यामुळे चौकीच्या उद्घाटनाचा फार्स कशासाठी केला याची विचारणा नागरिकांतून होत आहे.
वडगावची पोलीस चौकी पालिका चौकात मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे शहरात कायदा, मारामाऱ्या, बाजारावर नियंत्रण ठेवणे आदीसाठी उपयोगी आहे. तर वठार परिसरात राष्ट्रीय महामार्ग जातो. येथे अपघात, लुटमार आदी प्रसंग घडतात. संबंधित गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी दोन्ही पोलीस चौकी सुरू असणे गरजेचे आहे.