वीज बिल माफीसाठी बुधवारी वडगाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:53+5:302020-12-07T04:17:53+5:30
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज ग्राहकांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. ...

वीज बिल माफीसाठी बुधवारी वडगाव बंद
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज ग्राहकांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. यापूर्वी धरणे आंदोलन, टाळाठोक अशी आंदोलने केली; पण महाविकास आघाडी सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे पुढचा टप्पा म्हणून साखळी पद्धतीने गाव बंद आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा बाबासो पाटील-भुयेकर व इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी वडगाव येथे बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते.
तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करू म्हणणारे सरकार लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करीत नाही. उलट त्यांचे मंत्री उलटसुलट वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप या बैठकीत केला. या मागणीसाठी बुधवार (दि. ९) वडगाव बंद ठेवून लढा तीव्र करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, नगरसेवक जवाहर सलगर, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय गोंदकर, प्रज्योत शहा, शिवाजी शिंदे, सदाशिव कुलकर्णी, महावीर पाटील, उत्तम पाटील, संतोष पाटील, जिनेंद्र देसाई, आदी उपस्थित होते.