बाजार समितीचे मेमध्ये मतदान शक्य

By Admin | Updated: January 19, 2015 00:50 IST2015-01-19T00:41:43+5:302015-01-19T00:50:10+5:30

नव्या यादीनेच निवडणूक : कोल्हापूरसह वडगाव, गडहिंग्लज समितीची रणधुमाळी

Voting of the Market Committee in May | बाजार समितीचे मेमध्ये मतदान शक्य

बाजार समितीचे मेमध्ये मतदान शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची आगामी निवडणूक नवीन मतदार यादीनुसार होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मतदार विकास संस्थांच्या निवडणुका मार्चअखेर संपल्यानंतर एप्रिलमध्ये समितीची रणधुमाळी उडणार आहे. एप्रिलमध्ये मतदार यादी तयारीची प्रक्रिया सुरू होऊन मेच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होऊ शकते.
बाजार समितीच्या संचालकांची मुदत आॅक्टोबर २०१२ मध्ये संपलेली आहे. त्यामुळे मतदार यादीची प्रक्रिया जून २०१२पासूनच सुरू झाली; पण दुष्काळाचे कारण पुढे करीत निवडणुकीला मुदतवाढ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ संपल्यानंतर जानेवारी २०१३ मध्ये मतदारयादीवर हरकती घेत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार, तोपर्यंत चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यानंतर विविध कारणांनी समितीची निवडणूक दोनवेळा लांबणीवर टाकण्यात आली. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने राज्यातील मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका त्वरित घेण्याचे आदेश दिले. याबाबत बाजार समित्यांच्या पातळीवर संभ्रमावस्था कायम होती. बाजार समितीचे मतदार असणाऱ्या विकास संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे मतदारयादी कशी तयार करायची हा पेच समित्यांसमोर होता. जिल्ह्यातील कोल्हापूर शेती उत्पन्न, गडहिंग्लज व वडगाव या तीन बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
मुदत संपल्याने बाजार समितीची निवडणूक घ्यावी, यासाठी विदर्भातील एका समितीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शासनाला याबाबत विचारणा केली होती. समित्यांच्या प्राथमिक मतदार असलेल्या विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने ही निवडणूक प्रक्रिया सुरू करता येत नसल्याचे शासनाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. यावर विकास संस्थांच्या निवडणुका मार्चपर्यंत पूर्ण करून त्यानंतर समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह वडगाव व गडहिंग्लज समितीची रणधुमाळी एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात प्राथमिक मतदार यादी, हरकती व अंतिम मतदार यादी तयार होऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. साधारणत: मेच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Voting of the Market Committee in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.