मतदार यादीचा घोळ मिटेना, अधिकारी गेले चक्रावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:37 IST2021-03-04T13:34:08+5:302021-03-04T13:37:43+5:30
Muncipal Corporation Kolhapur-प्रभाग रचना व आरक्षणाचे काम चांगले केले म्हणून कौतुकाचे धनी ठरलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात मात्र फेल गेले आहेत. मतदार याद्यांवर आलेल्या भरमसाठ हरकती निकालात काढता काढता उत्तररात्रीपर्यंत अधिकारी जागत आहेत. एखादे काम बेजबाबदारपणे केले की त्याचा त्रास नंतर किती होतो याचा अनुभव ते घेत आहेत.

मतदार यादीचा घोळ मिटेना, अधिकारी गेले चक्रावून
कोल्हापूर : प्रभाग रचना व आरक्षणाचे काम चांगले केले म्हणून कौतुकाचे धनी ठरलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात मात्र फेल गेले आहेत. मतदार याद्यांवर आलेल्या भरमसाठ हरकती निकालात काढता काढता उत्तररात्रीपर्यंत अधिकारी जागत आहेत. एखादे काम बेजबाबदारपणे केले की त्याचा त्रास नंतर किती होतो याचा अनुभव ते घेत आहेत.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. दि. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. त्यावर दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर करायच्या होत्या. या मुदतीत तब्बल १८०० हरकती दाखल झाल्या.
एवढ्या मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामातील उथळपणा स्पष्ट झाला. दि. ३ मार्चपर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर करायच्या असल्यामुळे कमीत कमी वेळात १८०० हरकतींवर निर्णय घ्यायचा होता, प्रत्यक्षात क्षेत्रभेटी देऊन याद्या निर्दोष करायच्या होत्या; परंतु प्रारुप याद्याच चुकीच्या केल्या गेल्याचा परिणाम महापालिका प्रशासनाला भोगावे लागत आहेत.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. २ मार्चपर्यंत तयार करून त्या आयोगाला सादर करायच्या होत्या; परंतु यादीतील घोळ काही केल्या मिटता मिटत नसल्याने आज नाही उद्या आयोगाला पाठविणार आहोत, असे सांगण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. थोडा विलंब झाला तरी चालेल, पण निर्दोष याद्या तयार करून त्या आयोगाकडे पाठविण्यात येतील, असे उपायुक्त रविकांत आडसुळे यांनी सांगितले.