‘विवेकानंद’च भारी---कलाविष्कारांची उधळण.. युवा महोत्सवाचा समारोप
By Admin | Updated: October 13, 2014 00:39 IST2014-10-12T23:43:14+5:302014-10-13T00:39:38+5:30
वैयक्तिक प्रकारात ‘केआयटी’ प्रथम : लोककलेत न्यू कॉलेज, लोकनृत्यात पतंगराव कदम कॉलेजची बाजी

‘विवेकानंद’च भारी---कलाविष्कारांची उधळण.. युवा महोत्सवाचा समारोप
संतोष मिठारी - जत - लक्षवेधक कलांचे सादरीकरण करत कोल्हापूरचे विवेकानंद महाविद्यालय सांघिक प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी ठरले. सलग सातव्या वर्षी या महाविद्यालयाने विजेतेपदावर नाव कोरले. लोककला प्रकारात न्यू कॉलेज, लोकनृत्यात सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम कॉलेजने बाजी मारली, तर वैयक्तिक प्रकारात सलग दुसऱ्यावर्षी केआयटी कॉलेज अव्वल ठरले. विजयी झालेल्या महाविद्यालयांचे संघ व त्यांच्या समर्थकांनी मुख्य रंगमंच परिसरात जोरदार जल्लोष केला. तरूणाईच्या जल्लोषाचे उधाण घेऊन आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या ३४व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा आज समारोप झाला. विजेते संघ व स्पर्धेकांना कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विवेकानंद महाविद्यालयाला अभिजित कदम मेमोरियल चषक, तर लोककलेतील न्यू कॉलेजला ‘सरदार दादासाहेब माने’ आणि लोकनृत्यात डॉ. पतंगराव कदम कॉलेजला ‘सरदार बाबासाहेब माने स्मृती चषक तसेच केआयटी कॉलेजला ‘माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार वैयकतीक स्पर्धा सर्वसाधारण विजेतेपदाच्या फिरता चषकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. ए. बी. राजगे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. अशोक कारंडे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत हेळवी, एम. एल. होनगेकर, बी. एन. पवार, सी. जे. खिलारे आदी उपस्थित होते. राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सूत्रसंचालन केले.
जत (जि. सांगली) येथील राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा ३४ वा मध्यवर्ती युवा महोत्सवतील लोकनृत्यातील ‘सरदार बाबासाहेब माने स्मृती चषक पटकविणाऱ्या डॉ. पतंगराव कदम कॉलेजच्या संघासमवेत कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, एस. वाय. होनगेकर, डी. आर. मोरे, ‘बीसीयुडी’ संचालक ए. बी. राजगे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे आदी उपस्थित होते.
कलाविष्कारांची उधळण...
विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा समारोप
खास प्रतिनिधी - जत ...तबला, ढोलकी व सूरपेटीतून लावण्यांचा रंगढंग आणि दिलखेचक अदांचा अनुभव, एकपात्रीतील सामाजिक आशय, वास्तव, काळ आणि वेगाचे संतुलन राखणारे मातीकाम, सामाजिक समस्यांवर व्यंगचित्रांचे फटकारे, लोकवाद्यवृंदाचा सप्तरंगी कळस अशा स्वरूपात आज, रविवारी तरुणाईने कलाविष्कारांची उधळण केली. युवा चैतन्याने रंगलेल्या जत (जि. सांगली) येथील राजे रामराव महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठाच्या ३४व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा उत्साही वातावरणात समारोप झाला.
महाविद्यालयाच्या इमारती समोरील मुख्य रंगमंचावरून एकपात्री सादरीकरणाने आज सकाळी महोत्सवास सुरुवात झाली. मोबाईल मॅनिया, स्वच्छ भारत, चला खेड्यांकडे, व्हॉटस्-अॅपचे दुष्परिणाम, परीक्षेचे महत्त्व आदी विषयांतील आशय वास्तवाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. एकपात्री पाठोपाठ अन्य स्पर्धा सुरू झाल्या. ग्रंथालय इमारतीत रंगसंगती साधत वेगवेगळ्या चित्रकृतींतून पोस्टर पेटिंगद्वारे स्पर्धकांनी ‘पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा’चा संदेश दिला. राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, कला, क्रीडा अशा प्रश्नांची उत्तरे देताना युवक-युवतींच्या बुद्धिमत्तेचा प्रश्नमंजुषेत चांगलाच कस लागला. नकलांनी उपस्थितांच्या डोक्यात हसता हसता पर्यावरण, पशुपक्ष्यांच्या रक्षणासह विविध प्रश्नांबाबत प्रकाश पाडला. ‘एक से बढकर एक’ अशा व्यंगचित्रांनी ्रभ्रष्टाचार, बेरोजगारी, आदी सामाजिक समस्यांचा वेध घेतला. काळ आणि वेगाच्या संकल्पनेतून मातीकामात लक्षवेधक रूपे साकारली. स्थळचित्रणातून महाविद्यालयाचा परिसर कॅनव्हॉसवर उतरवला.
पी-ढबाकचा सूर, हलकी-घुमकं आणि खैताळ, ढोल-ताशांचा कडकडाट, ढोलकी आणि दिमडीच्या तालामधील लोकवाद्यवृंदाने सप्तरंगांची उधळण केली. दुपारच्या सत्राने युवक-युवतींच्या जल्लोषात अधिकच भर घातली. तबला, ढोलकी आणि सूरपेटीतून लावण्यांचा रंगढंग अनुभवायला मिळाला. स्पर्धकांच्या दिलखेचक अदांनी उपस्थितांना डोलविले. युवा महोत्सवाचा आज शेवटचा दिवस असल्याने मुख्य रंगमंचाचा परिसर गर्दीने खचाखच भरला होता. संघ आणि स्पर्धकांना आपआपल्या ‘स्टाईल’ने प्रोत्साहन देत प्रत्येक कलाप्रकाराचा तरुणाईने मनसोक्त आनंद लुटला.
पाकचे १२ नागरिक ठार, ५२ जखमी
१ ते १० आॅक्टोबर दरम्यान भारताने २० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, एलओसीवर २० वेळा, तर आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रणरेषेवर २२ वेळा गोळीबार झाला आहे. त्यात पाकिस्तानचे १२ नागरिक मरण पावले असून, ५२ नागरिक व ९ सैनिक जखमी झाले आहेत, अशी माहितीही अझीझ यांनी दिली आहे. जून ते आॅगस्ट २०१४ दरम्यान भारताने ९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, एलओसीवर १७४ वेळा व आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रणरेषेवर ६० वेळा गोळीबार केला आहे, असेही अझीझ या पत्रात म्हणतात.