वाघजाई डोंगराखालची गावे मृत्यूच्या दाढेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:03+5:302021-09-09T04:30:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या वाघजाई डोंगरावरील जमिनी घेऊन त्याचे सपाटीकरण ...

वाघजाई डोंगराखालची गावे मृत्यूच्या दाढेत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर व पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या वाघजाई डोंगरावरील जमिनी घेऊन त्याचे सपाटीकरण केल्याने आता डोंगरावरील माती भुसभुसीत होऊ लागली आहे. मुसळधार पावसामुळे ही माती घसरण्यास सुरुवात झाल्याने डोंगराखालील गावे अक्षरश : मृत्यूच्या दाढेतील जीवन अनुभवत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असणारी मरळी, भामटे कळंबे, सातार्डे या गावांना या भूस्खलनाचा जास्त धोका आहे. दरम्यान, डोंगरावरील सपाटीकरण थांबवा असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. वाघजाई डोंगरावर जमीन खरेदी करणाऱ्या लोकांनी येथे सपाटीकरण व उत्खननाचा सपाटा सुरू केला. यामुळे डोंगरावरील नैसर्गिक ओढे, ओघळ, दऱ्या बुजवण्यात आल्या आहेत. डोंगरावर पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने मुसळधार पावसाचे पाणी सरळ डोंगराचा भागच घेऊन पायथ्याशी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे डोंगराखालची गावे भीतीच्या छायेत वावरत आहेत. या सपाटीकरणाला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात माळीणसारखी दुर्घटना भविष्यात घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
चौकट : वाघजाई डोंगरावरील जमीन खरेदी-विक्रीसंदर्भात लोकमतने आवाज उठविल्यानंतर आता पन्हाळा तहसीलदारांनीही याची दखल घेतली आहे. डोंगरावरील सपाटीकरण रोखा असे आदेशच तहसीलदार रमेश शेंडगे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोट : शासकीय जमिनीवर होणारे सपाटीकरण व उत्खनन यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष हवे. ही यंत्रणा वाघजाई डोंगरावरील परिस्थिती पाहता झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसते. माळीण दुर्घटनेसारखा प्रकार झाल्यानंतर ही यंत्रणा पंचनामा करायला येणार का.
अरुण निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते