२७ जानेवारी रोजी होणाऱ्या सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हातकंणगले तालुक्यामधे २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल तयार करताना पॅनेलप्रमुख नेत्यांचा कस लागला होता. कोणत्या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा तर आरक्षण कोणते पडते ही शक्यता गृहीत धरून उमेदवारी दिल्या आहेत. संभावित आरक्षणाचे नियोजन करत काही उमेदवारांनी निवडणुकीत ताकद लावली होती. त्यातील काही जणांना यश आले तर काही जणांना अपयश. आता आरक्षणाकडे नेते, उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आपल्या गटाकडे संभावित आरक्षणाचा उमेदवार नसेल तर काय करायचे, याची रणनीती आखली जात आहे. संभाव्य आरक्षणाबाबत तर्क-वितर्क, अंदाज लढवत कार्यकर्ते गोळा बेरीज करण्यात व्यस्त आहेत. आता सरपंच कोण ही उत्कंठा निर्माण झाले असल्याचे पाहावयाला मिळत आहे. तर निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या पॅनेल प्रमुखाकडे नेत्याच्याकडे पदांच्या साकडे घालण्याचे काम सुरू आहे. २७ जानेवारी रोजी सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली असून सोडतीनंतरच गावचा सरपंच कोण होईल हे स्पष्ट होणार असून त्यानंतरच सत्ता स्थापनेसाठीच्या घडामोडी वेगाने होणार आहे. सध्या तरी काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये नेते मंडळी जपूनच पावले टाकत आहेत.
गावकऱ्यांचे लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST