भुदरगड तालुक्यातील रानमेव्यांना बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:12 IST2016-05-17T22:15:37+5:302016-05-18T00:12:07+5:30
प्रक्रिया उद्योगांची गरज : कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासनस्तरावरून डोळेझाक

भुदरगड तालुक्यातील रानमेव्यांना बहर
बाजीराव जठार --वाघापूर --भुदरगड तालुक्यातील डोंगराळ भागात करवंदे, जांभूळ, काजू, आंबा, फणस, आळू, चिकण्या, तोरण, नेर्ली यासारख्या रानमेव्यांना बहर आला आहे. रानमेव्याला हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावेत, या कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासन मात्र डोळेझाक करीत आहे. रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केल्यास यापासून लोणचे, मुरांबा, फणसपोळी, ज्युस, सुका मेवा यासारखे पदार्थ तयार करून ते बारमाही मिळण्याची सोय होईल; पण आज हा रानमेवा नाशवंत असल्याने व्यापारी व दलाल म्हणतील त्या भावाने द्यावा लागतो. दऱ्याखोऱ्यातून, डोंगरातून आणि काट्याकुट्यातून दिवसभर मेहनत घेऊन आणलेल्या या रानमेव्याचा कष्टकऱ्यांपेक्षा दलालांनाच जास्त फायदा होतो. यासाठी शासनाने या रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा केल्यास तालुक्यातील लोकांना रोजगार मिळेल. कच्च्या मालाच्या विक्रीतून ग्रामीण जनतेस थोडी कमाई होईल.
रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करण्यासाठी शासनाची मदत हवी. मोठमोठ्या उद्योगांना सरकार लाखो रुपयांचे अनुदान देते; मात्र ग्रामीण भागातील उद्योगांकडे सोयिस्कर डोळेझाक करते. मग ग्रामीण जनता छोट्या-मोठ्या उद्योगाच्या प्रवाहात कशी येणार? असा प्रश्न तालुकावासीयांच्या मनात निर्माण होत आहे.
भुदरगड तालुका संघाने रानमेव्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडे तशी पूरक जागादेखील उपलब्ध आहे. तरी त्यांची मागणी असल्यास उद्योग उभारणीस सहकार व पणनच्या माध्यमातून चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करू.
- नाथाजी पाटील, भाजप तालुका अध्यक्ष (भुदरगड) व संचालक, बाजार समिती, कोल्हापूर.
खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग
उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. अशा पद्धतीचा उद्योग उभा केल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांना फळ उद्योगातून अधिक पैसे व रोजगार उपलब्ध होईल.
- एकनाथ जठार, जिल्हा सरचिटणीस,
स्वाभिमानी शेतकरी संघटना.