श्रमसंस्कृ तीचे संस्कार करणारे विद्यामंदिर चन्नेकुप्पी
By Admin | Updated: July 18, 2015 00:17 IST2015-07-17T23:52:59+5:302015-07-18T00:17:15+5:30
--गुणवंत शाळा

श्रमसंस्कृ तीचे संस्कार करणारे विद्यामंदिर चन्नेकुप्पी
गडहिंग्लज तालुक्यातील चन्नेकुप्पी हे गाव व तेथील जिल्हा परिषदेची विद्यामंदिर शाळा खरोखरंच गुणवत्तेची आहे. सुसज्ज इमारत, पुरेसे क्रीडांगण, माध्यान्न पोषणासाठी शेड असून, स्वच्छता अगदी नजरेत भरणारी आहे. विद्यार्थ्यांना श्रमसंस्कृतीचे संस्कार देण्याच्या प्रयत्नामुळे ही स्वच्छ परिसराची सुसज्ज शाळा पाहायला मिळाली. शिक्षकवृंद आत्मियतेने व परिश्रम घेणारा आहे. शाळा हेच एकमेव कार्यक्षेत्र मानून विद्यादानावर लक्ष केंद्रित करण्याचा खटाटोप खूप भावणारा असून, त्यांच्या या भूमिकेला साथ मिळली आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांची. आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत घालावे म्हणून ही मंडळी पालक प्रबोधनासाठी धडपड करत आहेत.
सुसज्ज इमारत, स्वच्छ व नीटनेटक्या वर्गखोल्या, तक्ते, नकाशे व इतरही शैक्षणिक साहित्य अगदी पृथ्वीच्या गोलासह शाळेत आढळले. येथे डिजिटल वर्गही असून, अन्य शैक्षणिक साधनांची उपलब्धता व वापर होत आहे. प्रयोगशाळा हवी तेवढी व अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आहे, ज्यामध्ये विद्यार्थी विज्ञानाचे कृतिशील शिक्षण व प्रयोगातून तत्त्वे शिकत आहेत.
‘बालगीत मंच’ ही शाळेची अभिमानास्पद बाब आहे. सुरेल आवाज, सुरेख संगीत, वाद्यसाधनाची साथ व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा मंच खूप भावणारा आहे. बालवयात गायन व संगीताची आवड, छंद निर्माण करणारा हा बालगीत मंंच आहे. ‘वाद्यवृंद’ मुलांचा फार आनंद देणारा आणि शिक्षकांची साथ इतकी मनापासूनची की, वाद्ये ऐकताना खूप भारावून जायला होते.
झांजपथक आणि लेझीम स्वागताला होतेच. त्यांचा उत्साह व कौशल्य अगदी लक्षात राहील असे. तसेच त्यांच्या शिस्तबद्घ हालचालीतून त्यांचे हे पथक मन प्रसन्न करणारे आहे. गावातील राष्ट्रीय व सामाजिक कार्यक्रमांप्रसंगी हे पथक स्वागतासाठी तत्पर असते.
गावची शाळा म्हणून गावकऱ्यांना अभिमान वाटतो. शाळा गुणवत्तेची, शिक्षक झपाटून काम करणारे, शैक्षणिक दर्जा उंचावलेला यामुळे शाळेसाठी लोकसहभाग चांगल्या प्रकारे मिळत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचा पुढाकार व सहकार्य खूप चांगले आहे. मूल्यमापन समितीच्या भेटीवेळी ही मंडळी हजर राहिलेली. इतरही दिवशी त्यांचे शाळेकडे लक्ष आहे. ‘गावची अस्मिता- शाळेची गुणवत्ता’ हे सूत्र घेऊन गावचे लोकप्रतिनिधी, पालक, गावची मंडळी शाळेसाठी आपले योगदान देतात. संगणक, लॅपटॉप, एल.सी.डी. अशासारख्या आधुनिक शिक्षण साधनांचा वापर करण्यात येत आहे. कॉम्प्युटर कक्ष आहे. नियोजनपूर्वक प्रत्येक वर्गासाठी त्याचा वापर व्हावा म्हणून तसे टाईमटेबल करण्यात आले आहे. टेक्नोसॅव्ही व्हावीत, या दृष्टीनेही तयारी करून घेतली जात आहे. उच्चशिक्षित व प्रशिक्षित शिक्षकवृंद ही या शाळेची फार मोठी जमेची बाजू असून, मुख्याध्यापक एम.ए.एम.एड्.़ बाकी शिक्षकही पदव्युत्तर, फक्त तीन शिक्षक डी.एड़् व तेही अनुभवी असल्याने शिक्षकांचे टीम वर्क शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरत आहे.
- डॉ. लीला पाटील
(समाप्त)
शाळेची वैशिष्ट्ये
वाचन, लेखन व गणिती किमान अध्ययन क्षमता प्राप्त झालेले विद्यार्थी. सर्वंकष गुणवत्ता मूल्यमापन केल्याने, त्याचे रेकॉर्ड अगदी व्यवस्थित आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा राखलेली ही शाळा आहे. सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांचे जादा तास, तयारी व अभ्यास होणे घडते.
पहिलीपासून स्पर्धा परीक्षेच्यादृष्टीने अध्यापन व अध्ययन, इंग्रजी विषयासाठी खास प्रयत्न, ज्ञानरचना, आधारित अध्यापन व त्याच पद्घतीने अध्ययनाची दिशा दिली जात आहे.
सुसज्ज संगणक कक्ष, स्वतंत्र ग्रंथालय व समृद्घी, विज्ञानकक्ष कम् प्रयोगशाळा हे सर्वच शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी पुरक अनुकूल आहेत.
‘सुपर व्हायसरी अभ्यासिका’ चालू ठेवून विद्यार्थ्यांना स्वस्थ चित्ताने अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आठवड्याचे नियोजन आणि टर्न बाय टर्न शिक्षकांची उपस्थिती होत रहाते. आरोग्य तपासणी व मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देणारी ही शाळा, ज्ञानवर्धित करण्यासाठी ‘भेंड्या’ हा उपक्रम हाती घेतला गेला आहे.
भूगोल, इतिहास व पर्यावरण विषयाचे कल्पनेने अध्ययन होत आहे. कार्यानुभव म्हणून कृती शिक्षणातून मुलांनी केलेल्या वस्तू अत्यंत देखण्या आहेत. कार्यानुभव म्हणजे कृती शिक्षण ते मेंदू बुद्घी अवयव याच्या वापरातून कल्पकतेने केलेले आढळले.