हिरवेपण जपलेले विद्यामंदिर, बोरवडे
By Admin | Updated: July 2, 2015 00:23 IST2015-07-02T00:13:14+5:302015-07-02T00:23:14+5:30
--गुणवंत शाळा

हिरवेपण जपलेले विद्यामंदिर, बोरवडे
बोरवडे (ता. कागल) येथील विद्यामंदिर ही शाळा गावाच्या बाहेर आहे. वीट बांधकामाचे भक्कम कंपाउंड असून, कंपाउंडला लागून आत गर्द झाडी आहे. गेटमधून आत दोन्ही बाजूंनी नारळाची झाडं. फळांनी जणू गर्दी करून आपल्या अस्तित्वाची दखल घेण्याची स्पर्धा लावल्याचे जाणवते. डाव्या हाताला वनौषधी बाग आहे. या भागाला ‘आॅक्सिजन बाग’ हे नाव. एक छोटंसं लॉन, मध्येच गुलाबी जांभळ्या रंगाची झुबकेदार वनस्पती. अशी निसर्गरम्यतेची अनुभूती आणि नेत्रसुख देणारी बाग स्वागतासाठी!
मुख्याध्यापकांच्या कार्यालयात विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो, शाळेची माहिती. संगणकाची खोली समृद्ध आहे. ११ संगणक असून शाळेची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची सगळी माहिती संगणकीकृत आहे. शालेय पोषण आहारापासून विद्यार्थीसंख्येपर्यंत सर्व माहिती संगणकात भरली आहे. शाळेत १२ शिक्षक व तेही सर्व एमएससीआयटी कोर्स झालेले. दोन शिक्षक पुण्यात मायक्रोसॉफ्टचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत.
बोरवडे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाचा लाभ देतात. पाठ्यपुस्तकांतील धडे संगणकाच्या मदतीने शिकविले जातात. प्रश्नसंच सोडविण्याची सोय संगणकामध्ये केली आहे. रिकाम्या वेळेत आॅफ तासाला मुले प्रश्नसंच सोडवितात व त्यावर त्यांना चित्रे काढता येतात, रंगविता येतात. इंटरनेटची माहिती असणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत.
या शाळेत सर्व साहित्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ताब्यात असते. खरे तर नियमानुसार जे वापरण्यायोग्य नाही, ते निर्लेखित करण्याचा मार्ग मोकळा असताना, शैक्षणिक साहित्य हे बंदिस्त ठेवण्यात येऊ नये. बोरवडे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेली मानचिन्हे आणि पदके पाहून मुलांची गुणवत्ता लक्षात येते. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक समयदान म्हणजे सकाळी मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात. सुटीच्या दिवशीही मुलं शाळेत येतात. शाळा सुटण्याची घंटा इथं होत नाही. घंटेच्या तालावर शाळा नाही. शिकविणारा व शिकणारा दोघेही आपल्याच नादात म्हणजे आपापल्या अध्यापन व अध्ययनात मग्न असतात. शिक्षक व शिकणारे विद्यार्थी शिकविण्याचं-शिकण्याचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय शाळेतून बाहेर पडत नाहीत. अभ्यास होईपर्यंत विद्यार्थी शाळेतच थांबतात. इथल्या मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी जा असं म्हणावं लागतं. हेच तर शैक्षणिक दर्जा व शिक्षणाची गोडी लावल्याचे व लागल्याचे प्रतीक! १०० टक्के मुले शिष्यवृत्ती परीक्षेस बसले व पास झाले आणि दोन गुणवत्ता यादीत आले आहेत. जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’, ‘वनश्री पुरस्कार’, ‘साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार’ असे विविध पुरस्कार मिळविलेले आहेत.
विद्यामंदिर बोरवडे शाळा, जिथे नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिला जात आहे. सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांची धडपड आहे. अभ्यास, परीक्षा, मूल्यमापन हे तर नियमित चालू असते. चाचण्या या नियमानुसार नव्हे, तर जास्त घेतल्या जातात. शिक्षकांवर पालकांचा विश्वास, पाल्यांसाठी शिक्षक हेच गुरुदेव असे घरांमधून संस्कार, लोकसहभाग व लोकांचे सहकार्य हेच शाळा गुणवत्तेची होण्यामागील कारणे आहेत. लोकप्रतिनिधी विशेषत: ग्रामपंचायतीने शाळेस आपली शाळा मानले आहे. शिक्षक, पदाधिकारी, पालक यांनी मनावर घेतलं, इच्छाशक्तीच्या जोरावर वाटचाल करण्याचा निर्धार केला, तर किती कायापालट होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बोरवडेची विद्यामंदिर शाळा.
- डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये
शाळेत झाडं, झाडांत शाळा. नारळाची १५५ झाडं. पपई, काजू, आंबा या फळांची झाडं आणि स्वच्छता तर नजरेत भरणारी.
ा्रामपंचायतीनं या हिरव्या शाळेसाठी पाण्याची दहा कनेक्शन्स दिली आहेत. शाळेवर, झाडांवर प्रेम करण्यास ही शाळा शिकविते.
शाळेत गांडूळ खत प्रकल्प, गोबर गॅस प्रकल्प आहे. शाळेत प्रश्नमंजूषा घेतली जाते. वर्षातील सुरुवातीला सर्व मुलांना पुरतील इतक्या वह्या शैक्षणिक उठावातून घेतल्या जातात व मोफत मुलांना दिल्या जातात.
सर्व वर्ग बोलके आहेत. व्हरांडा बोलका आहे. पहिली-दुसरीच्या वर्गासमोर प्राणी, पक्ष्यांची चित्रे काढली आहेत. शाळेतील मुलं मर्दानी खेळ खेळतात.
शैक्षणिक गुणवत्ता हा तर शिक्षक व शाळा यांचे प्रथम क्रमांकाचे ध्येय आहे. तरीही कबड्डी, अॅथलेटिक खेळांमध्ये शाळेला जिल्हा स्तरावर विजेतेपद मिळालेले आहे.
या शाळेतील विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत. हीच शिस्त शिक्षकांकडून झिरपलेली. गाव, सोसायटी, प्रतिष्ठित व्यक्ती, शेतकरी यांच्या योगदानातून शाळेने हिरवेपण जपले आहे.
शाळेला पाच एकर जागा आहे. या जागेत पर्यावरणाची शिकवण देणारे वृक्ष, वेली, फुलझाडं डुलत-झुलत आहेत.
विद्यार्थ्यांना सृजनशीलता, उपक्रमशीलता, श्रमसंस्कृती, ज्ञानार्जन यांची ओढ वाढविणारे निसर्गरम्य वातावरण व शिक्षकांचे अध्यापन आहे.