पारळे क्रिकेट ॲकॅडमीची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:32+5:302021-02-05T07:13:32+5:30
कोल्हापूर : दीर्घकालावधीनंतर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या टी२० क्रिकेट स्पर्धेत विठ्ठल पारळे क्रिकेट ॲकॅडमीने करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनचा ...

पारळे क्रिकेट ॲकॅडमीची विजयी सलामी
कोल्हापूर : दीर्घकालावधीनंतर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या टी२० क्रिकेट स्पर्धेत विठ्ठल पारळे क्रिकेट ॲकॅडमीने करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनचा २ गडी राखून पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
राजाराम काॅलेज मैदानावर बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्याचे उद्घाटन स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, जनार्दन यादव, आदी उपस्थित होते.
प्रथम फलंदाजी करताना करवीर संघाने २० षटकांत ८ बाद १४६ धावांचा डोंगर रचला. यात आर्यन देसाई ३५, अब्दुलमतीन शेखने २०, आर्य खांडेकरने १९, ओम मोहितेने १९, अनुराग मेस्त्रीने १७ आणि नितेश केंबानी याने ११ धावा केल्या. गोलंदाजी करताना पारळे ॲकॅडमीकडून सिद्धेश जाधवने दोन, अभिजीत कदम, सोहेल नदाफ, विश्वजीत नागोसे, आदित्य भोसले यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल फलंदाजी करताना पारळे संघाने हे आव्हान १८.५ षटकांत ८ बाद १४७ धावा करीत पार केले. यात विश्वजित नागोसे याने ३३ चेंडूत ८४ धावांची दमदार खेळी केली. त्याला अर्जुन पाटीलने १५, पृथ्वी पुरोहितने १२ आणि सिद्धेश जाधव याने ११ धावा करीत मोलाची साथ दिली. करवीरकडून गोलंदाजी करताना अब्दुलमतीन शेखने दोन, अद्वैत कुलकर्णी , आर्य खांडेकर, रोशन पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.