सांगली, बेळगावची विजयी सलामी

By Admin | Updated: November 18, 2015 00:33 IST2015-11-18T00:33:28+5:302015-11-18T00:33:50+5:30

गडहिंग्लज युनायटेड करंडक : स्पर्धेचे अकरावे वर्ष; १६ संघांचा सहभाग

The victorious salute of Sangli, Belgaum | सांगली, बेळगावची विजयी सलामी

सांगली, बेळगावची विजयी सलामी

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सांगली, यवतमाळ, हुबळी व बेळगाव संघांनी विजयी सलामी दिली. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेला यंदा हसन मुश्रीफ फौंडेशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहाने सहकार्य केले आहे.
मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, शशिकांत चुयेकर, रमेश रेडेकर, सतीश घाळी, शिरीष गणाचारी, संभाजी शिवारे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय फुटबॉलपटू संदीप गोंधळी यांनी आणलेल्या क्रीडाज्योतीचे स्वागत सुनील चौगुले यांनी केले.
सांगली फुटबॉल असोसिएशनने औरंगाबादच्या बजाज अ‍ॅटोचा ७-०ने धुव्वा उडविला. सांगलीच्या रोहित सातपुतेने स्पर्धेत गोलचे हॅट्ट्रिक करण्याचा मान मिळविला. औरंगाबादतर्फे सलीम नदाफ, रमेश गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळ केला.
यवतमाळ फे्रंडस् क्लबने बेळगावच्या एचएमडी स्पोर्टस्चा ३-१ ने पराभव केला. मध्यंतरापर्यंत सामना १-१ बरोबरीत होता. उत्तरार्धात यवतमाळच्या सलमान पिंजारीने सलग दोन गोल करून संघाला ३-१ ने विजय मिळवून दिला. बेळगावकडून मुदस्सर बेपारी, अन्सार अलवडकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.
तिसऱ्या सामन्यात बेळगावच्या तेराफेरा संघाने गडहिंग्लजच्या संभाजीराजे क्लबवर २-१ असा निसटता विजय मिळविला. गडहिंग्लजच्या राहुल पाटील याने दहाव्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर बेळगावच्या पुनेद बेपारीने गोल करून सामना बरोबरीत आणला. सामन्यात उत्तरार्धात बेळगावच्या अभिषेक चेरेकरने मैदानी गोल करून सामना जिंकून दिला. गडहिंग्लजच्या रोहित सुतारने उत्कृष्ट खेळ केला.
चौथ्या सामन्यात हुबळीच्या गांधीवाडा संघाने खानापूरच्या युनायटेडचा ३-१ ने पराभव केला. हुबळीने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत सुनील जे, शशीकुमार, अमोघ वाय यांनी लागोपाठ तीन गोल नोंदवून विजय मिळविला. खानापूरकडून अक्षयने एकमेव गोल केला.
उमेश कांबळे (बेळगाव), जी गिरीश तायवाडे (यवतमाळ), किरण चौकाशी (बेळगाव) यांना सामनावीर, तर साकोरे (औरंगाबाद), झिया मुजावर (बेळगाव), विशाल पाटील (गडहिंग्लज), अक्षय सी (खानापूर) यांना लढवय्या खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The victorious salute of Sangli, Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.