फाटलेल्या रेशनकार्डाने घेतला माणुसकीचा बळी

By Admin | Updated: July 29, 2014 00:05 IST2014-07-28T23:59:01+5:302014-07-29T00:05:12+5:30

रुग्णालयाचा वेदनादायी अनुभव : चांगले उपचार मात्र पैसे भरून

A victim of Humanity took a torn ration card | फाटलेल्या रेशनकार्डाने घेतला माणुसकीचा बळी

फाटलेल्या रेशनकार्डाने घेतला माणुसकीचा बळी

विश्वास पाटील- कोल्हापूर ..दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड आहे, परंतु ते फाटलेले असल्याने रुग्णालयाने ते स्वीकारले नाही. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील हमालाच्या मुलावर गावाने लाख रुपये वर्गणी गोळा करून मेंदूची शस्त्रक्रिया केली. रेशनकार्ड फाटलेले होते; परंतु त्या कुटुंबाची परिस्थिती पाहून रुग्णालयाने थोडीशी माणुसकी दाखवली असती तर या शाळकरी मुलावर शासनाच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतून उपचार होऊ शकले असते. पालकांना पैसे गोळा करण्यासाठी दारोदार फिरावे लागले नसते. या सगळ््या घोळात मुलाचा जीव वाचला. परंतु माणुसकीचा बळी गेला, असाच अनुभव सोनार कुटुंबीयांना आला.
आंबार्डे (ता.शाहूवाडी) येथील प्रशांत पांडुरंग सोनार याच्याबाबतीत हा प्रसंग घडला. प्रशांत गावातीलच शिवपार्वती हायस्कूलमध्ये नववीत शिकतो. १७ जुलैला मित्राला दवाखान्यातून घेऊन येताना तो वडापच्या जीपमधून खाली पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यास सुरुवातीस शाहूवाडीत खासगी रुग्णालयात नंतर येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये तेथून सीपीआरमध्ये सरतेशेवटी अ‍ॅपल सरस्वती रुग्णालयात १९ जुलैला सायंकाळी दाखल करण्यात आले. त्याचे वडील येथील मार्केट कमिटीत हमाली करतात. आई गृहिणी आहे. हमालीचे अंगावरील काम करून जे आठ-दहा हजार रुपये मिळतात. त्यावरून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचे दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड आहे. परंतु, ते त्यांना नीट ठेवता आलेले नव्हते. त्याच्या पुरत्या चिंध्या झालेल्या.
आम्ही दोन दिवसांत नवे कार्ड आणून दाखवितो. परंतु आरोग्यदायी योजनेतून उपचार करावेत, असे पालकांचे म्हणणे होते. मात्र, अ‍ॅपल रुग्णालयाने कार्ड असल्याशिवाय असे उपचार करता येणार नाहीत, असे त्यांना सांगितले. त्यासाठी एक लाख रुपयांचे पॅकेज सांगण्यात आले. त्यातील ५० हजार रुपये शस्त्रक्रियेपूर्वी भरण्याच्या सूचना करण्यात आल्या.
पालकांची परिस्थिती हलाखीची.
माणुसकीच्या नात्याने या मुलावर उपचार करण्यासाठी गाव पुढे सरसावले. ग्रामस्थांनी व मुंबईकर लोकांनी ५० हजार रुपये जमा करून दिल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. उपचार चांगले झाल्यामुळे त्याचा जीव वाचला. हे अ‍ॅपल सरस्वती रुग्णालयामुळेच शक्य झाले. परंतु त्यासाठी योजना असतानाही पैसे
गोळा करण्यासाठी पालकांची प्रचंड तारांबळ उडाली. शिवाय पालकांच्या डोक्यावर लाखाचे कर्ज झाले. १९ ला प्रशांतला रुग्णालयात दाखल केले व त्यांना २२ तारखेला नवे कार्ड
मिळाले. परंतु त्याचा आता काहीच उपयोग नाही, असे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
यासंदर्भात राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांना विचारणा केली. ते म्हणाले, ‘कार्ड हवेच त्याशिवाय विमा कंपन्या प्रस्ताव मंजूर करत नाहीत. परंतु टेलिफोनिक मंजुरी घेऊन कागदपत्रे गोळा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला जातो. त्या काळात कागदपत्रे जमा करता आली नाहीत तर उपचाराचे पैसे भरून घेता येऊ शकतात, तसे प्रयत्न या रुग्णालयांकडून व्हायला हवे होते.’
अ‍ॅपल सरस्वती रुग्णालयाचे व्यवस्थापक श्रीधर कुलकर्णी म्हणाले, ‘आम्ही त्याच्यावर उपचार केले हीच चूक झाली. त्या मुलाच्या पालकांना राजीव गांधी रुग्णालयाचा प्रस्ताव मीच दिला. परंतु त्यांच्याकडे रेशनकार्ड नव्हते. नवे रेशनकार्ड ७२ तासांत उपलब्ध होणे शक्य नव्हते. त्यामुळे मोठी शस्त्रक्रिया असूनही ती आम्ही काही भार सोसून माणुसकी म्हणूनच लाख रुपयांत केली आहे. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. त्यासाठी त्यावेळी पालकांची संमती होती, आता त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे आमच्यादृष्टीने वेदनादायी आहे.’

आव्हाडांपर्यंत संपर्क
पालक तरी गरीब आणि मुलावर तरी उपचार व्हायला हवेत, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. शेतकरी संघाचे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांच्यापर्यंत ही अडचण गेल्यावर त्यांनी आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत दाद मागितली. त्यांनी रुग्णालयाचे नाव व पेशंटचे नाव लिहून घेतले आणि बघतो, असे आश्वासन दिले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे गेल्यावर त्यांनी रुग्णालयास उर्वरित २५ हजार रुपये भरून घेऊ नयेत, असे सांगितले. परंतु, त्याचाही काही उपयोग झाला नाही. आतापर्यंत ९० हजार रुपये भरले आहेत उर्वरित १० हजार भरून रुग्णास उद्या, मंगळवारी घरी सोडण्यात येणार आहे.

Web Title: A victim of Humanity took a torn ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.