जयसिंगपुरात नो एंट्रीतून वाहने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:23+5:302021-07-19T04:16:23+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : शहरातून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे मुख्य चौक असणाऱ्या क्रांती चौकात ...

जयसिंगपुरात नो एंट्रीतून वाहने सुसाट
संदीप बावचे
जयसिंगपूर : शहरातून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे मुख्य चौक असणाऱ्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. शहराबाहेरून बायपास रस्ते असताना अवजड वाहनांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा फलक नावालाच उरला आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर जयसिंगपूर शहर वसले आहे. गेल्या दहा वर्षांपासून महामार्गावरील समस्यांची मालिका आजही कायम आहे. चौपदरीकरणांतर्गत जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या दुहेरी मार्गाचे अर्धवट काम झाले आहे. लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे महामार्गावरील वाहतुकीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यातच सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवहार खुले करण्यात आले आहेत.
शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहराबाहेरून बायपास रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा वापर होताना दिसत नाही. एखाद्या अपघाताच्या घटनेनंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येतो, त्यावर चर्चा होते. मात्र, तात्पुरती उपाययोजना सोडली, तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या... प्रमाणे वाहतुकीचा बोजवारा उडालेलाच असतो.
जयसिंगपूर शहराबाहेर उदगाव ते केपीटी मार्गे चौंडेश्वरी सूतगिरणी तसेच तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर मार्गे उदगाव टोलनाका असे दोन बायपास रस्ते आहेत. शहरातून अवजड वाहनांना रोखण्यासाठी केवळ फलक लावण्यापलीकडे कोणतीही उपाययोजना अलीकडील काळात होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना रोखण्यासाठी कारवाईची मोहीम राबविली तरच शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. पर्यायाने जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
------------------
चौकट -
लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा
कोल्हापूर ते सांगली मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे शिरोली ते सांगली या महामार्गावरील रस्त्याच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मजबुतीकरणाला गती मिळणार आहे. एकीकडे लोकप्रतिनिधी रस्ते मजबुतीकरणासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना दिसून येत नाहीत.
फोटो - १८०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
जयसिंगपूर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.