कोल्हापूर जिल्ह्यात वाहनविक्री जोमात, नऊ महिन्यांत ९० हजार नवीन वाहने रस्त्यावर
By सचिन यादव | Updated: October 10, 2025 18:25 IST2025-10-10T18:25:14+5:302025-10-10T18:25:36+5:30
महिन्याला हजार कार, चार हजार नव्या दुचाकी येतात रस्त्यावर

संग्रहित छाया
सचिन यादव
कोल्हापूर : जिल्ह्यात रोज सरासरी ३३३ नव्या वाहनांची (दरमहा १० हजार) विक्री होत आहे. यामध्ये रोज सरासरी एक हजार कार आणि चार हजार दुचाकींसह इतर वाहने रस्त्यावर असल्याची माहिती कोल्हापूर आणि इचलकरंजी आरटीओकडील नोंदीवरून समोर आली आहे. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या नऊ महिन्यांत ९० हजार वाहने रस्त्यावर आली आहेत. त्यात दुचाकी, चारचाकी, मालवाहतुकीच्या वाहनांसह कृषी ट्रॅक्टर्सची संख्या मोठी आहे.
कोल्हापूर, इचलकरंजीसह राष्ट्रीय महामार्ग परिसरात चारचाकी, ट्रॅक्टर्सचे सर्वाधिक शोरूम आहेत. त्यासह शहरात दुचाकीचे शोरूम आहेत. याशिवाय बहुतेक तालुक्यांमध्ये देखील कंपन्यांची शोरूम आहेत. कोणत्याही कंपनीची कोणत्याही मॉडेलची दुचाकी, चारचाकी घेण्यासाठी मुंबई आणि पुणे येथे जावे लागत नाही. इतकी शोरूम कोल्हापुरात आहेत.
तीस वर्षांपूर्वी एखाद्या गावात एकमेव चारचाकी, बोटावर मोजण्याइतक्याच दुचाकी दिसायच्या. काही वर्षांपूर्वी दुचाकीसाठी नंबर लावावा लागत होता. त्याची डिलिव्हरी तीन महिन्यांनंतर ग्राहकांना मिळत होती. आता घरातील प्रत्येक सदस्यांकडे दुचाकी, सरासरी प्रत्येक घरात चारचाकी आहे. काहींकडे पेट्रोलसह इलेक्ट्रिक बाइकही आहे. केवळ आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, कमीत कमी डाऊन पेमेंट आणि त्यासाठी अनेक बँका, फायनान्सचे कर्ज ग्राहकांना सहजासहजी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
‘आरटीओ’कडील वाहन खरेदीची नोंद
महिना/ कार/ चारचाकी/ दुचाकी/ ट्रॅक्टर/ मालवाहतूक
- जानेवारी / १३०८/ ४२९३ / १३१ / २२४
- फेब्रुवारी / ६०३ / ३०७९ / १४० / १३५
- मार्च / ११७५ / ४४८५ / ११० / २२८
- एप्रिल / ८१७ / ५८३१ / १०५ / १४७
- मे / ७०२ / ४६५२ / ९३ / १३४
- जून / ७२० / २९७१ / ८७ / १४१
- जुलै /८२३ / ३३०४ / १०७ / १२५
- ऑगस्ट/ ९५४ / ३४४४ / ६२ / १५५
- सप्टेंबर /८९५ / ३११९ / ८२ / १३२
इचलकरंजी ४३ हजार वाहनांची विक्री
इचलकरंजी (एमएच ५१) मध्ये गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४३ हजार वाहनांची विक्री झाली आहे. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने अधिक विक्री झाली आहेत.
जिल्ह्यात होणारी वाहनांची विक्री अशी..
चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या काळात दरमहा सरासरी चार हजार दुचाकी आणि एक हजार चारचाकी खरेदी ग्राहकांनी केल्याचे दोन्ही आरटीओ कार्यालयाकडील नोंदीवरून समोर आले आहे. शहर-जिल्ह्यात नवे वर्ष गुढीपाडवा, दिवाळी-दसरा, धनत्रयोदशी अशां शुभमुहूर्तावर वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.
कोल्हापूर आरटीओकडील दरमहा नोंदणीची आकडेवारी
- जानेवारी / ६२०२
- फेब्रुवारी / ४१२३
- मार्च/६११८
- एप्रिल/७१२२
- मे /५७२१
- जून/ ४०७२
- जुलै/४४८५
- ऑगस्ट/ ४७७२
- सप्टेंबर /४३९९
वाहन नोंदणीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सणासुदीच्या काळातही मोठ्या संख्येने वाहनांची नोंद केली जाते. त्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर