CoronaVirus Lockdown : लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेत्यांना हटविले, पुन्हा बसल्यास कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:11 IST2020-06-11T19:09:56+5:302020-06-11T19:11:43+5:30
कोरोनाच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरीचा परिसर हा अतिजोखमीचा असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संस्थेने दिल्यानंतर लागलीच या परिसरातच रस्त्यांवर भरणारी भाजी मंडई गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाने हटविली. येथे बसणाऱ्या सुमारे दोनशेवर भाजी व फळ विक्रेत्यांना आता शहरात अन्यत्र व्यवसाय करावा लागणार आहे.

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील मुख्य रस्त्यावर भाजी व फळ विक्री करण्यास बसणाऱ्या सर्व विक्रेत्यांना गुरुवारी महापालिका प्रशासनाने तेथून हटविले आणि रस्ता मोकळा केला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : कोरोनाच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरीचा परिसर हा अतिजोखमीचा असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संस्थेने दिल्यानंतर लागलीच या परिसरातच रस्त्यांवर भरणारी भाजी मंडई गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाने हटविली. येथे बसणाऱ्या सुमारे दोनशेवर भाजी व फळ विक्रेत्यांना आता शहरात अन्यत्र व्यवसाय करावा लागणार आहे.
देशभरात कोरोना संसर्ग वाढत जाईल तसे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने काही नियम केले आणि त्यांची अंमलबजावणी सुरू केली. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत रवी बँकेच्या ठिकाणी भरणारी भाजी मंडई संसर्गाच्या भीतीमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे ते फोर्ड कॉर्नर आणि उमा टॉकीज या रस्त्यांवर आणली.
या दोन्ही रस्त्यांवर सुमारे दोनशेहून अधिक फळ तसेच भाजी विक्रेते व्यवसाय करीत होते. त्यांना दुपारी कधी तीन वाजेपर्यंत, तर कधी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. दोन महिने ही मंडई रस्त्यावरच भरत होती; परंतु त्या परिसरात खूप गर्दी होऊ लागली.