व्यापार-उद्योगात पुढारलेला वीरशैव लिंगायत समाज
By Admin | Updated: April 13, 2015 00:02 IST2015-04-12T23:30:18+5:302015-04-13T00:02:16+5:30
शहर विकासात अग्रेसर : राजर्षी शाहू महाराज यांच्या निमत्रंणावरून आणि व्यापाराच्या निमित्ताने कोल्हापुरात दाखल--लोकमतसंगे जाणून घेऊ

व्यापार-उद्योगात पुढारलेला वीरशैव लिंगायत समाज
इंदुमती गणेश - कोल्हापूर -लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा राजाश्रय लाभलेल्या विविध धर्मांपैकी वीरशैव लिंगायत हा एक समाज. शाहू महाराजांच्या निमंत्रणावरून आणि व्यापाराच्या निमित्ताने कोल्हापुरात स्थायिक झालेल्या या समाजाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत या शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वीरशैव लिंगायत हा एक प्राचीन धर्म आहे. महात्मा बसवेश्वर हे वीरशैव समाजातील एक महत्त्वाची विभूती आहेत. बसवेश्वर हे शंकराच्या नंदीचा अवतार आहेत, असा पुराणात उल्लेख आहे. या धर्माची पाच प्रमुख पीठे आहेत. या धर्मातही लिंगायत कोष्टी, माळी, तेली, कुंभार, दिधावंत, चिलवंत अशा पोटजाती आहेत. म्हणजे ‘किराणा व अडत व्यापार करणारा समाज म्हणजेच वाणी’ अशी या समाजाची ओळख.
समाजातील विरूपाक्ष नष्टे, स्वामी कद्रे आणि कंपनी, बाळाप्पा चौगुले, राजाराम गाडवे, विरूपाक्ष टकले, काशाप्पाण्णा करंबळी हे व्यापारानिमित्त कोल्हापुरात आले. उदरनिर्वाहासाठी आलेल्या या वीरशैव समाजातील व्यक्तींनी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, मार्केट यार्ड, मंडई याठिकाणी जागा घेऊन किराणा व अडत व्यापाराला सुरुवात केली. वैशिष्ट्य म्हणजे आजही या समाजातील ८० टक्के लोक याच व्यवसायात आहेत. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, कापड, मिठाई, हॉटेल, अवजड उद्योग असणारे कारखाने, विविध कंपन्या स्थापन करून त्यांनी आपली प्रगती केली आहे.
महादेव अण्णा तोडकर यांनी १९६७ साली कोल्हापूर वीरशैव समाजाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सर्व वीरशैव लिंगायत समाज एकत्र आला. समाजातर्फे दरवर्षी बसवेश्वर जयंती, शिवजयंती, अक्कमहादेवी जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने व्याख्याने, मिरवणूक, महाप्रसाद व मान्यवरांचा सत्कार केला जातो. विविध गणाधीशांची प्रवचने, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, वधू-वर मेळावा, रोजगार निर्मितीची माहिती देणे, स्नेहसंमेलन असे कार्यक्रम घेतले जातात.
वीरशैव, अक्कमहादेवी महिला मंडळातर्फे प्रत्येक बुधवारी ‘भजन-तरंग’ हा कार्यक्रम घेतला जातो. यात शंभरहून अधिक महिला सहभागी होतात. महिलांसाठी विविध पाककला स्पर्धा, नृत्य, वेशभूषा स्पर्धा, नवरात्रौत्सवात रास-दांडिया, हळदी-कुंकू, सहली असे उपक्रम राबविले जातात. तसेच विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविलेल्या महिलांना अक्कमहादेवी पुरस्कारही दिला जातो.
समाजाच्या विकासासाठी बिंदू चौक परिसरात १९६४ साली चंद्रकांत करंबळी यांनी अक्कमहादेवी मंटप व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले. रावसाहेब माळी यांनी वीरशैव बँकेची स्थापना १९४२ ला केली. या बँकेचे १८ हजार सभासद आहेत. बँकेच्या २६ शाखा असून ५०० कोटींच्या वर ठेवी आहेत. गरजू समाजबांधवांना बँकेचा मोठा आधार आहे.
शून्य सिंहासन परंपरेतील कर्नाटकातील बृहन्मठ श्री चित्रदुर्गचे जगद्गुरू श्री जयदेव महास्वामीजी अथणी येथे आले असता त्यांची राजर्षी शाहू महाराजांशी भेट झाली. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण दिले. स्वामीजींचे कोल्हापुरात ‘अड्डपालखी’ उत्सवाने भव्य स्वागत करण्यात आले. राजर्षींनी जगद्गुरूंना वीरशैव समाजातील मुलांनी शिकावे, त्यांच्या राहण्याची सोय व्हावी, हा समाज विकसित व्हावा यासाठी १९०६ ला दसरा चौकातील चित्रदुर्ग मठाची जागा दिली. येथील वसतिगृहात कै. रत्नाप्पाण्णा कुंभार, भारताचे उपराष्ट्रपती कै. बी. डी. जप्ती, अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी वास्तव्य करून शिक्षण घेतले आहे.
कोल्हापुरात महात्मा बसवेश्वरांचा एकही पुतळा नाही. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासमोरील चौकात बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारून या चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी समाजाची मागणी आहे. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या काळात त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेले होते. मात्र, अद्याप हा विषय प्रलंबित आहे.