वसंतदादा, जिल्हा बँक चौकशीला आव्हान देणार

By Admin | Updated: January 16, 2015 00:15 IST2015-01-15T23:41:27+5:302015-01-16T00:15:47+5:30

माजी संचालकांचा निर्णय : निकालाची प्रत मिळताच उच्च न्यायालयात धाव

Vasantdada, District Bank will challenge the inquiry | वसंतदादा, जिल्हा बँक चौकशीला आव्हान देणार

वसंतदादा, जिल्हा बँक चौकशीला आव्हान देणार

सांगली : सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कलम ८८ च्या चौकशीचा मार्ग खुला केल्यानंतर आता दोन्ही बँकांच्या माजी संचालकांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. सहकारमंत्र्यांच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर याबाबतची कार्यवाही केली जाईल, असे माजी संचालकांनी सांगितले.
वसंतदादा बँकेच्या कलम ८८ च्या चौकशीवरील स्थगिती उठवितानाच जिल्हा बँकेच्या माजी संचालकांची चौकशीविरोधातील मागणी फेटाळून सहकारमंत्र्यांनी अपील निकालात काढले. सहकारमंत्र्यांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात आता माजी संचालकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रा. सिकंदर जमादार म्हणाले की, सहकारमंत्र्यांनी घाईगडबडीत हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, १५७ कोटी रुपयांच्या आक्षेपांमधील प्रकरणांची छाननी न करता ढोबळमानाने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. अद्याप निकालाची प्रत आम्हाला मिळालेली नाही. प्रत मिळताच आम्ही न्यायालयात याविरोधात अपील करू.
वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांनीही जिल्हा बँकेच्या माजी संचालकांप्रमाणेच उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा चौकशीचे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासकीय पातळीवरही चौकशीबाबतच्या आदेशाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. सहकारमंत्र्यांकडून आदेश मिळाल्यानंतर कलम ८८ च्या चौकशीला पुन्हा सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vasantdada, District Bank will challenge the inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.