हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ‘उत्तरेश्वर मशीद’
By Admin | Updated: July 17, 2015 01:07 IST2015-07-17T01:05:56+5:302015-07-17T01:07:19+5:30
सामाजिक बांधीलकी : मशिदीच्या विस्तारीकरणासाठी हिंदू बांधवाने दिली जागा

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ‘उत्तरेश्वर मशीद’
कोल्हापूर : ‘पुरोगामी शहर’ म्हणून कोल्हापूरचं अख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाव आहे. एकोपा आणि समाजाची बांधीलकी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आता उत्तरेश्वर मशिदीचाही समावेश करावा लागणार आहे. त्याच्या बांधकामासाठी हिंदू बांधवाने अल्प किमतीत जमीन देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. उत्तरेश्वर मस्कुती तलावानजीक १९५४ मध्ये परिसरातील मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येत १५ बाय १० ची छोटी प्रार्थना करण्यासाठी खोली बांधण्यात आली. कालांतराने प्रार्थना करणाऱ्यांची संख्याही वाढल्याने १९७४ मध्ये शेजारची जागा हिंदू बांधवाकडे मागण्यात आली. ही मागणी मान्य करत अल्प किमतीत त्यावेळी ही जागा हिंदू बांधवाने मशिदीसाठी दिली. पुन्हा कालांतराने मशिदीचा विस्तार करण्याचा मानस विश्वस्तांनी केला. त्यानुसार मागील वर्षी १६ जून २०१४ ला मशिदीचे बांधकामास सुरुवात केली. या काळातही मशीद उभारण्यासाठी उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ आदी परिसरातील हिंदू बांधवांनी जमेल तशी मदत केली. पूर्वीपासून या परिसरात हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा आहे. हा एकोपा आजच्या काळातही आजच्या पिढीतील लहान थोरांसह सर्वांनी जपला आहे. शुक्रवार पेठेतील धनवडे गल्ली येथे चार मजली मशीद बांधण्यात आली असून या मशिदीवर आकर्षक असा मिनारही बांधण्यात आला आहे.
एकोपा आजही अबाधित
पूर्वीपासून या परिसरात हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा असून दिवाळी, ईद हे सण एकमेकांमध्ये मिळून मिसळून साजरे केले जातात. पूर्वीच्या काळीही हीच परंपरा या परिसराने जपली होती तशाच पद्धतीने आजच्या पिढीनेही हीच परंपरा जपली आहे. हा एकोपा अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एकीचा संदेश देणारा आहे.
- प्रा. अलाम नगारजी, विश्वस्त, उत्तरेश्वर मशीद