ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:16+5:302021-05-09T04:24:16+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत ...

ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करा
कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत असून प्रशासनाने सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना शनिवारी दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत अलर्ट केले आहे.
सध्या जिल्ह्यात ५० टन ऑक्सिजनची मागणी असताना ४० टनांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. बेल्लारीतून ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानंतर शनिवारपासून पुणे व रायगड येथून ऑक्सिजन पुरवठा सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला असला तरी रोज वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्याचे संकट समोर आहेच. त्यामुळे पुढचा टँकर कोल्हापुरात दाखल होईपर्यंत अधिकारीच ऑक्सिजनवर असतात. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वितरकांचीही बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.
मागील काही दिवसांत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानंतर सर्व वितरक या पुरवठ्याच्या चेनमधून गायब झाले आणि रुग्णालयांचे फोन थेट जिल्हा प्रशासनाला येऊ लागले. जिल्हा प्रशासनाचा रुग्णालयांशी थेट संपर्क नसतो. मात्र, रुग्णालयांकडून फोन यायला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी वितरकांना याबाबत अलर्ट केले.
---
पुढे दोन तास वापर
एक जम्बो सिलिंडरमधून पाच सहा रुग्णांना ऑक्सिजन दिला जात असेल तर ठरावीक मर्यादेपर्यंत ऑक्सिजन संपले की त्यातून पुरवठा बंद होतो. आणि तो काढून दुसरा लावला जातो; पण रिकाम्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन शिल्लक असतो, हा शिल्लक ऑक्सिजन एखाद्या रुग्णाला लावला तर पुढील दाेन तास तो पुरतो. अशारीतीने ऑक्सिजनचा वापर करा, पाइपलाइनमध्ये गळती होत असेल तर ती तातडीने थांबवा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
--