पिराचीवाडी-सावर्डे बुद्रुक रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:33+5:302021-06-09T04:30:33+5:30
बारडवाडी, तळाशी, कसबा वाळवे, पिराचीवाडी ते सावर्डे असा हा जिल्हामार्ग प्रमुख जिल्हामार्ग म्हणून दर्जोन्नत झाल्याने अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय ...

पिराचीवाडी-सावर्डे बुद्रुक रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती
बारडवाडी, तळाशी, कसबा वाळवे, पिराचीवाडी ते सावर्डे असा हा जिल्हामार्ग प्रमुख जिल्हामार्ग म्हणून दर्जोन्नत झाल्याने अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळणार आहे.
या रस्त्यावर खूप मोठी वर्दळ असते. गावांची संख्याही खूप आहे लोकसंख्या, रस्त्याचा होणारा वापर आणि लोकप्रतिनिधींचा रेटा व जिल्हा परिषदेच्या ठरावाचा विचार करून शासनाने हा रस्ता दर्जोन्नत केला आहे.
कसबा वाळवे ते पिराचीवाडी रस्ता करण्यास वनविभागाची हद्द असल्याने अडचण निर्माण झाली होती. वनविभागाच्या हद्दीतून हा रस्ता करण्याकरिता वन विभागाची मान्यता घेणे गरजेचे होते. याकरिता गेली तीन वर्षे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. वनविभागाने या रस्त्याला एक वर्षापूर्वी मान्यता दिल्याने या रस्त्याचे मजबुतीकरणासह खडीकरण झाले आहे.
दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्याचा उपयोग कागल व राधानगरीला जाण्यायेण्यासाठी विद्यार्थिवर्गाबरोबरच बाजारहाट, बँक कामकाज, तहसील कार्यालय, कोर्ट कामकाज व एमआयडीसीला जाणाऱ्या कामगार वर्गाला होणार आहे.
बारडवाडी ते सावर्डे बुद्रुक या १७ कि. मी. रस्त्याला प्रमुख जिल्हामार्ग म्हणून मान्यता मिळाल्याने जिल्ह्यात प्रमुख मार्गाची लांबी १९५०२ किलोमीटर एवढी झाली असून, इतर जिल्हामार्गांत १७ किलोमीटर घट झाली आहे.
या रस्त्याला प्रमुख जिल्हामार्ग म्हणून मान्यता मिळाल्याने दूधगंगा नदीवरील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू केलेल्या व जमीन हस्तांतरणाच्या वादात अडकलेल्या नवीन पुलाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.
यासाठी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषद सदस्या वंदना जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव यांचे सहकार्य मिळाले.