Unlimited Pack Limited of Mobile Company | मोबाईल कंपनीचा अनलिमिटेड पॅक लिमिटेड, नवीन दराची अंमलबजावणी सुरू
मोबाईल कंपनीचा अनलिमिटेड पॅक लिमिटेड, नवीन दराची अंमलबजावणी सुरू

ठळक मुद्देदुसऱ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा एक हजार मिनिटांनंतर जादा पैसे मोजावे लागणार

विनोद सावंत

कोल्हापूर : मोबाईल कंपनीच्या बदलेल्या दरामुळे ‘अनलिमिटेड पॅक’ योजना आता मोडीत निघाली आहे. ‘कंपनी टू कंपनी कॉलिंग’ मोफत राहणार असले तरी इतर कंपनीच्या मोबाईल ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा आल्या आहेत. महिन्याला एक हजार मिनिटेच मोफत कॉलिंग करता येणार आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर अनलिमिटेडचे पॅक सुमारे ५० रुपयांनी महाग झाले आहेत. नवीन दराची सोमवारी रात्री १२ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

मोबाईल कंपन्यांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. एकमेकांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. मोबाईल नंबर न बदलता दुसऱ्या कंपनीचे ग्राहक होण्यासाठीची पोर्टेबिलिटी योजना आल्यामुळे तर स्पर्धा कमी होण्याऐवजी वाढली. गेल्या काही वर्षांपासून या योजनेमुळे कंपनीची ग्राहक संख्या जर वाढली असली तरी तोट्यात मात्र, वाढ होत राहिली.

अखेर सरकारची मंजुरी घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासूनच कॉल आणि इंटरनेटच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. परिणामी पहिल्यांदा सवय लावायची आणि नंतर दरवाढ करायची या कंपनीच्या खेळीमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


अनलिमिटेड पॅकचे पूर्वीचे दर           बदललेला दर

१९९ रुपये (२८ दिवस)                      २४९ रुपये
३९९ रुपये (८४ दिवस)                      ५९९ रुपये

दुसऱ्या कंपनीच्या ग्राहकांची बोलण्याची मर्यादा - एक हजार मिनिटे


एकदा अनलिमिटेड पॅक मारल्यानंतर महिन्यात अथवा तीन महिन्यांच्या पॅकनुसार कोणाशीही कितीही वेळ बोलता येत होते. त्यामुळे ग्राहकांचा कल अनलिमिटेड पॅक घेण्याकडेच होता. आता इतर कंपनीच्या ग्राहकांना आवश्यकतेनुसारच बोलावे लागणार आहे. त्यामुळे नवीन नियमांमुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
- गणेश कुष्ठे,
मोबाईल रिचार्ज विके्रता


रिचार्ज मारणाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होणार
नवीन नियमामुळे कंपनीचा तोटा कमी होणार आहे तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दुसरीकडे रिचार्ज मारणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत. ‘अनलिमिटेड पॅक’चे दर वाढल्यामुळे तसेच एक हजार मिनिटांनंतर पुन्हा रिचार्ज मारावे लागणार असल्यामुळे रिचार्ज मारणाºयांच्या व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
 

 

Web Title: Unlimited Pack Limited of Mobile Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.