‘युनिटी कन्सल्टन्सी’च्या कामाची तपासणी करणार
By Admin | Updated: July 12, 2014 00:59 IST2014-07-12T00:54:51+5:302014-07-12T00:59:18+5:30
स्थायी सभा : थेट पाईपलाईन योजनेला खो घालण्याचे प्रयत्न

‘युनिटी कन्सल्टन्सी’च्या कामाची तपासणी करणार
कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेची सल्लागार युनिटी कन्सल्टन्सी या कंपनीची पार्श्वभूमीसह केलेल्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करावा, यानंतर योजनेच्या पुढील कामास सुरुवात करावी, असा निर्णय आज शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एका बाजूला योजनेसाठी जनसुनावणीकडे पाठ फिरवायची दुसरीकडे सल्लागार कंपनीची पाहणी करावयाची अशा दुटप्पी धोरणामुळे पडद्यामागून योजनेला खो घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
दरम्यान, यादवनगर झोपडपट्टी अतिक्रमण हटविण्याप्रकरणी चुकीच्या नोटिसा पाठविणाऱ्या उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांची बदली केल्याशिवाय पुढील स्थायीची बैठक होणार नाही, असा सज्जड दम सभापती सचिन चव्हाण यांनी दिला.
थेट पाईपलाईन योजनेच्या सल्लागार कंपनीबाबत उलटसुलट आरोप होत असताना प्रशासन गप्प का आहे. याचा खुलासा केला नाही, असा आक्षेप घेत सदस्यांनी योजनेबाबत कोणतीही शंका राहू नये यासाठी कंपनीच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सल्लागार कंपनी नेमून सहा महिने उलटले. आता उद्घाटनाची वेळ आली. तोपर्यंत सदस्यांनी कंपनीविषयी शंका का उपस्थित केली नाही. कंपनीबाबत आत्ताच हल्लाबोल करण्यामागे नेमके काय कारण आहे. याबाबत महापालिकेत विविध अंगांनी चर्चा सुरू आहे.
यादवनगर अतिक्रमणाबाबत जागा नसतानाही माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांना प्रशासनाने नोटीस बजावली. प्रशासन चव्हाण यांची पाठराखण करीत असल्याने जोपर्यंत चव्हाण यांची बदली ड्रेनेज विभागात होत नाही तोपर्यंत पुढील बैठक होणार नाही, असे सभापती सचिन चव्हाण यांनी जाहीर केले.
रिलायन्स जिओ कंपनीतर्फे शहरात २२ किलोमीटर खुदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. खुदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती कंपनीने केली नाही, तसेच पावसाळ्यात खुदाई करू नये यासाठी कंपनीचे काम थांबविण्याचा निर्णय स्थायी बैठकीत घेण्यात आला. महापालिकेच्या आरक्षित जागांवर फलक लावलेले नाहीत. प्रायोजित संस्थांच्या सहभागाने फलक लावण्याचे ठरले. तनवाणी हॉटेल प्रकरणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती प्रशासनाने ठेवली.