शिट्टी वाजवून साद.. जगावेगळा म्हशी पळविण्याचा नाद; कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही
By सचिन यादव | Updated: January 10, 2025 18:05 IST2025-01-10T18:05:24+5:302025-01-10T18:05:50+5:30
सुमारे दोन लाखांहून अधिक बक्षिसे

शिट्टी वाजवून साद.. जगावेगळा म्हशी पळविण्याचा नाद; कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही
सचिन यादव
कोल्हापूर : हलगीचा कडकडाट.. घुंगराचा चाळ.. शिंगाणा रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशी आणि म्हैस मालकांचा उत्साह, अशा वातावरणात कोल्हापुरात म्हशी आणि रेडकू पळविण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी सहा महिन्यांपासून तयारी केली जाते. त्यांचे प्रशिक्षण, आरोग्य, योग्य खुराक, सराव आणि मालकाची आज्ञा पाळण्याची शिस्तही लावली जाते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या स्पर्धा भरविल्या जात आहेत. सुमारे दोन लाखांहून अधिक बक्षिसे संयोजकांतर्फे दिली जात आहेत.
दिवाळी पाडव्या दिवशी कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याची स्पर्धा घेतल्या जातात. त्यासह शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, कसबा बावडा, पाचगाव या ठिकाणी ‘रोड शो’ आयोजित केले जातात. गेली अनेक वर्षे कोल्हापूरने ही परंपरा जपली आहे. कसबा बावडा येथील मार्केट परिसरात नागरिकांनी म्हशी घेऊन गर्दी करतात. शंभराहून अधिक म्हशी या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामध्ये मंगळवेढा, पंढरपूर, बेळगाव, बेगमपूर, मिरजसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील रेडकू आणि म्हशीचा सहभाग असतो.
पंचगंगा नदीवर म्हशी आंघोळ घातली जाते. त्यानंतर सजवलेल्या म्हशी कसबा बावडा येथे आणल्या जातात. म्हशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात व पायात घुंगरांची माळ, रिबीन, लांबलचक शिंग, रंगवलेल्या शिंगांवर रुबाबदार तुरे, इतकेच नाही, तर पायात चांदीचे तोडे आणि अंगावर गुलाल असलेल्या सुंदरींना सजविले जाते. या सुंदरींना पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक मोठी गर्दी करतात.
गौरा, राधा, सुंदरी अशी अनेक नावे या सुंदरींना दिल्या जातात. या म्हशी आपल्या मालका शेजारी तोऱ्यात उभ्या राहतात. त्यांच्यासाठी खास खेळ आयोजित केले जातात. शिट्टी वाजवून म्हशीला पळवणे, हलगीच्या तालावर म्हशींचा नाच आणि याहून मजेशीर म्हणजे गर्दीत मालकाच्या शिट्टीच्या आवाजाने म्हशीने आपल्या मालकाला ओळखणे, असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात.
दोन किलोमीटर अंतराची स्पर्धा
रेडकू आणि म्हशी पळविण्यासाठी स्पर्धेचे अंतर वेगळे आहे. रेडकूसाठी किमान जाता येता एक किलोमीटर तर म्हशींसाठी दोन ते सव्वादोन किलोमीटर धावण्याच्या स्पर्धा आहेत. मोटारसायकलवरून रेडकू, म्हैस पळविणे आणि तीन हाकेत म्हैस बोलविण्याच्या अनोख्या स्पर्धा घेतल्या जातात.
गेले १९ वर्षे या स्पर्धा भरविल्या जात आहेत. स्पर्धेचा अखंड उत्साह नागरिकांमध्ये आहे. ३० हजारांहून अधिक प्रेक्षक या स्पर्धा पाहतात. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी या स्पर्धा भरविल्या जात आहेत. आमच्या मंडळाने ही परंपरा आजतागायत जपली आहे. - संजय वाईकर, अध्यक्ष, श्रीकृष्ण मित्र मंडळ, महाडिक वसाहत.