शहरातील ३२० रुग्णालये विनापरवाने
By Admin | Updated: May 29, 2015 00:02 IST2015-05-28T23:31:16+5:302015-05-29T00:02:52+5:30
आरोग्य विभागाच्या नोटिसा : फायर सेफ्टी निकषांची पूर्तताच नाही; विमा संरक्षण मिळविण्यात रुग्णांना अडचणी

शहरातील ३२० रुग्णालये विनापरवाने
संतोष पाटील - कोल्हापूर -केंद्र सरकारने सर्व रुग्णालयांना १३ कलमी आग प्रतिबंधक (फायर सेफ्टी) निकषांची पूर्तता केल्यानंतरच परवाना देण्याचे आदेश तीन वर्षांपूर्वी दिले. शहरातील ३८८ पैकी फक्त ६० रुग्णालयांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. जिल्ह्यातील किमान ४९३ रुग्णालये या फायर सेफ्टीच्या नियमावलींची पूर्तता करू शकलेली नाहीत. शासनाच्या नियमांप्रमाणे ही रुग्णालये अवैध ठरत असून, त्यांचा परवानाच रद्द होणार आहे. अशा रुग्णालयात उपचार करणाऱ्यांना विमा संरक्षणच मिळणे बंद झाल्यांने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
कोलकात्यातील एएमआरआय हॉस्पिटलला ९ डिसेंबर २०११ ला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत ८९ लोकांचा मृत्यू झाला. या अग्नितांडवानंतर केंद्र सरकारने देशभरातील रुग्णालयांची आगप्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने झाडाझडती घेतली. ९५ टक्क्यांहून अधिक रुग्णालयांत पुरेशी आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे आढळले. त्यानंतर रुग्णालयांसाठी १३ कलमी फायर सेफ्टीचे निकष अनिवार्य केले. या निकषांची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयांची नव्याने नोंदणी किंवा परवान्यांचे नूतनीकरण करू नयेत, असे आदेश जारी केले. मात्र, गेल्या चार वर्षांत जुन्या रुग्णालयांना याची पूर्तता करणे शक्य झाले नाही.
बरीच रुग्णालये दाटीवाटीच्या ठिकाणी आहेत. येथे अग्निशमनचा बंब सोडाच स्ट्रेचरही जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे निकषांची पूर्तता करण्यावर स्थानिक स्वराज्य संस्था ठाम आहेत. यातील अटी शिथील करण्याची मागणी रुग्णालयांकडून होत आहे. निकषांची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयाची नव्याने नोंदणी न करता परवानाच रद्द केला जाणार आहे. आरोग्य विभागाने या सर्व रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या नव्या अटी जाचक असल्याने पूर्तता अशक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रुग्णालयांची अडचण
जुन्या रुग्णालयांना आत येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग ठेवणे अशक्य आह.े तसेच पाण्याच्या टाकी बसविण्याची क्षमता इमारतींमध्ये नाही. फायर सेफ्टीच्या दृष्टीने हे बदल आवश्यक असल्याने यासाठी खर्च करण्यास रुग्णालयांची ना नाही. मात्र, जुन्या इमारतींमध्ये असे बदल करताच येऊ शकत नाहीत. हेच दुखणे असल्याचे अनेक रुग्णालय चालकांनी सांगितले.
पार्किंगचाही बोजवारा
किमान २० खाटांच्या रुग्णालयासाठी ७५ टक्के रुग्णांची उपस्थिती गृहीत धरल्यास रुग्णास भेटावयास येणाऱ्यांची संख्या व रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी आदी मिळून ३१ दुचाकी व ७ मोटर गाड्या रस्त्यावरच थांबतात. शहरातील मोजक्याच रुग्णालयामध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
असे आहेत निकष...
रुग्णालयात पूरक संख्येने फायर एक्स्टिंग्विशर हवेत
रुग्णालयाच्या प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग असावेत.
स्मोक डिटेक्टर, ड्राय रायझर, हाऊस रोल, वेट रायझर बसविणे सक्तीचे आहे.
रुग्णालयामध्ये भूमिगत ५० हजार लिटर क्षमतेची तसेच टेरेसवर १५ हजार लिटरची पाण्याची टाकी असावी. जागोजागी वाळूने भरलेल्या बादल्या हव्यात.
इमारतीच्या सभोवताली अग्निशमन यंत्रणेला फिरता येईल, अशी व्यवस्था असावी.
आपत्तकालीन स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना असावे.
वास्तवाचे भान ठेवून रुग्णालयांनी आग प्रतिबंधक निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. परवाना नसल्याने अशा रुग्णालयांतून विमा संरक्षण मिळणे बंद झाले आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
- सौ. शीतल कवाळे
शहरातील फक्त ६० रुग्णालयांनी आतापर्यंत एनओसी घेतली आहे. जुन्या इमारतींचा विचार करता मनपाला असलेल्या अधिकारांचा वापर करून काही प्रमाणात सूट देणे शक्य आहे, तरीही रुग्णालये हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र आहे.
- रणजित चिले,
चीफ फायर आॅफिसर, मनपा