कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारांनी प्रशिक्षणातून मिळवले १३ कोटी; पात्र कोण, अटी काय.. वाचा सविस्तर
By पोपट केशव पवार | Updated: July 14, 2025 18:05 IST2025-07-14T18:04:48+5:302025-07-14T18:05:54+5:30
तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते

कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारांनी प्रशिक्षणातून मिळवले १३ कोटी; पात्र कोण, अटी काय.. वाचा सविस्तर
पोपट पवार
कोल्हापूर : बारावी, आयटीआय, पदवीधर असूनही हाताला काम नसलेल्या जिल्ह्यातील साडेतीन हजार बेरोजगार तरुणांच्या मदतीला राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कामी आली आहे. या योजनेअंतर्गत सहा ते ११ महिन्यांपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करत जिल्ह्यातील तीन हजार ३९४ विद्यार्थ्यांनी १० महिन्यांत तब्बल १३ कोटी १५ लाख १८ हजार ९३५ रुपयांचे विद्यावेतन मिळवले आहे.
या योजनेत, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत, उमेदवारांना दरमहा सहा हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाते.
या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार, तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ ते जून २०२५ या १० महिन्यांच्या कालावधीत ३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांना १३ कोटी रुपये इतके विद्यावेतन देण्यात आले.
या योजनेसाठी कोण आहेत पात्र
या उपक्रमांतर्गत बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांनी व रोजगार देणाऱ्या विविध आस्थापनांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
काय आहेत अटी?
या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन दिले जात नाही. प्रशिक्षणार्थीने या अटींची पूर्तता केली असली परंतु, संबंधित प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहत नाही.